सावरकरांनी सांगितलेले देश शस्त्रसज्ज करण्याचे महत्त्व !
सावरकरांना अत्याचाराचे पुरस्कर्ते म्हणणार्यांनी सावरकरांची पुढील वाक्येही लक्षात घ्यावीत, ‘‘परराज्य उलथून पाडले जाताच क्रांतीकारकांनी पुढील ब्रीदवाक्ये आपल्या कार्यक्रम फलकावर आणि हृदयावर कोरून टाकली पाहिजेत. ‘देशांतर्गत संविधान – बाहेर सशस्त्र क्रांती ! घरात निर्बंध – बाहेर खड्ग ! घरात शांती – बाहेर शक्ती !’’
सावरकर म्हणतात, ‘‘चिमण्यांनी ‘आम्ही तटस्थ आहोत’ म्हणून घोषणा केली, तरी त्यांच्यावर झेप घालण्यास ससाणे थोडेच सोडणार आहेत ? शस्त्रबळांवाचून असुरक्षित संपत्ती हीच लुटारू; पण सशस्त्र परराष्ट्रीय दरोडेखोरांना एक प्रलोभन असे आमंत्रण असते. तुमच्या शत्रूस्थानी असलेल्या राष्ट्रांच्या सशस्त्र आक्रमणांपासून संरक्षण करणार्या भूदलाचे, नौदलाचे नि विमानदलाचे सवाई शस्त्रबळ तुमच्यापाशी नसेल, तर त्या तुमच्या सार्या औद्योगिक कारखान्यांची, अन्नधान्याची, विद्यापिठांची नि संपत्तीची लुटालूट करून परकीय आक्रमक धूळधाण उडवल्यावाचून रहाणार नाहीत. या कटू सत्याचा अनुभव घेऊनही आपले डोळे कधी उघडणार आहेत ?
– (संदर्भ : ‘हिंदुपदपादशाही’, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर )
सावरकर म्हणतात, ‘आजच्या जगास ज्ञात असलेली शस्त्रास्त्रे शोधून काढणे आणि घडवणे यांसाठी शतावधी रसायनशाळा खटपटत राहिल्या पाहिजेत अन् सहस्रावधी शस्त्रास्त्रांचे कारखाने सार्या देशभर खणखणत राहिले पाहिजेत. असे बलवत्तर झालात म्हणजे जगास सांगू शकाल की, आम्ही आक्रमण करणार नाही किंवा तटस्थ राहू इच्छितो. त्या शब्दांना त्या वेळी काहीतरी अर्थ येईल !’
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, श्री गजानन आशिष, ऑक्टोबर २०१०
‘१८९५ च्या पाच वर्षे आधीपासून भारतात जी काही राजकीय चळवळ चालली होती, तिची मुख्य सूत्रे या काँग्रेसच्या हाती आलेली होती आणि त्या काँग्रेसला ब्रिटीशनिष्ठेने पछाडलेले होते; परंतु ब्रिटीशनिष्ठेच्या भूतबाधेतून या राष्ट्रीय संस्थेला सोडवण्याचा चंग बांधलेला एक बलवत्तर ‘मांत्रिक’ याच सुमारास भारतीय राजकारणाच्या रिंगणात उतरला ! (संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर’)
इंग्लंडमधील वास्तव्यात तरुणांमध्ये मानसिक परिवर्तन करून स्वातंत्र्यासाठी वधस्तंभ सतत ओला ठेवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विद्यार्थ्यांची मानसिकता पालटली. ‘मीच राष्ट्र आहे’ अशी भावना विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात त्यांनी चेतवली. त्यामुळे आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याच्या प्रयत्नात त्यांनी अन्य समाजाची वाट पाहिली नाही. ते पुढे घुसले आणि त्यांनी मागच्यांसाठी मार्ग मोकळा केला. काँग्रेसच्या कारकिर्दीत देशभक्तांना व्यासपीठ नव्हते. स्वतः सावरकरांनी म्हटले आहे की, त्यांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेने भारताच्या स्वातंत्र्याचा अखंड उद्घोष करण्यासाठी असे सर्वाेच्च व्यासपीठ उत्पन्न केले की, जे ब्रिटिशांना सर्व शक्तीसामर्थ्य वापरूनही कधी मोडता आले नाही. ते व्यासपीठ होते फाशीचा खांब ! क्रांतीकारकांच्या उष्ण रक्ताच्या सिंचनाने हा वधस्तंभ सतत ओला राहिला इतके मानसिक परिवर्तन तरुण सावरकरांनी आपल्या चार वर्षांच्या विलक्षण रोमहर्षक वास्तव्यात इंग्लंडमधील आणि भारतातील युवा पिढीत निर्माण केले !
भारतीय संरक्षणसिद्धतेचे उद्गाते : स्वातंत्र्यवीर सावरकर !
भारतीय तरुणांनी सैनिकी प्रशिक्षण आत्मसात करावे; म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतभर भ्रमण करून सैनिकीकरणाचा प्रचार केला. यामागे स्वातंत्र्य मिळताच एक शिस्तबद्ध आधुनिक युद्धाचे तंत्र आणि मंत्र आत्मसात केलेले सैन्य भारतास लाभावे, असा त्यांचा हेतू होता. त्यामुळेच स्वा. सावरकर हे आधुनिक भारतीय संरक्षणसिद्धतेचे उद्गाते होते, हे लक्षात येते. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांतील अधिकार्यांत सौहार्दता, सहकार्य आणि समविचारांची देवाण-घेवाण व्हावी; म्हणून एक ‘सैनिकी प्रबोधिनी’ असावी, हा विचार प्रथम स्वा. सावरकरांनीच मांडून एक आराखडा सिद्ध केला होता. त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे १९५४ या वर्षी स्थापन झालेली खडकवासला, पुणे येथील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’. १९३७ या वर्षी डॉ. धर्मवीर मुंजे यांनी स्थापन केलेली नाशिक येथील ‘सैनिकी प्रशाला’ हीसुद्धा स्वा. सावरकर यांच्या प्रेरणेने आणि आदेशाने उभारण्यात आली होती.
– श्री. विनायक श्रीधर अभ्यंकर (दैनिक ‘लोकसत्ता’, २८ मे २०१३)
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व कळलेले सेनापती आणि रणांगणतज्ञ माणेकशॉ !
रशिया-अमेरिका ‘हे आक्रमक देश आपल्याला काय म्हणतील ?’, या काल्पनिक भीतीने, सद्गुणविकृतीने भारतीय सैन्याला अखंड भारताचाच भाग असलेल्या फुटीर प्रदेशातून काँग्रेसी राज्यकर्त्यांनी परत बोलावले ! या घटनेचा उल्लेख करून बांगलादेश युद्धाच्या विजयाचे सेनापती आणि रणांगणतज्ञ सॅम माणेकशॉ पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करतांना म्हणाले, ‘‘सावरकरजी, आपण भारताचे पंतप्रधान असता, तर आम्हाला ढाक्यामधून परत बोलावले गेले नसते. आपण उलट विचारले असते की, रावळपिंडीवर भारताचा ध्वज का लावला नाहीत ? आपण पंतप्रधान असता, तर आपणाला असा प्रश्न विचारावाच लागला नसता. आपल्या हस्तेच आम्ही ढाका नि रावळपिंडीवरही भारताचा ध्वज फडकवला असता !’’
(दैनिक ‘सनातन प्रभात’, (२८.६.२००८))