साहित्यिक सावरकर !

लेखण्या मोडा, बंदुका उचला !

‘पुढील दहा वर्षांत सुनिते रचणारा एकही तरुण नाही निघाला, तरी चालेल. साहित्यसंमेलने नाही झाली, तरी चालतील; पण दहा-दहा सहस्र सैनिकांचे वीरचमू आपल्या खांद्यांवर नव्यातील नव्या बंदुका टाकून राष्ट्र्राच्या मार्गा-मार्गांतून, शिबिरा-शिबिरांतून टप टप करीत संचलन करतांना दिसला पाहिजे ! ग्रंथालयांइतकी सैनिकी विद्यालये गजबजलेली दिसली पाहिजेत. मग अधूनमधून त्यांनी एखादी प्रेमकथा वाचली, सुनीत रचले, तरी चालेल. देहलीच्या बादशहाची दाढी जाळून आल्यावर पहिले बाजीरावही मस्तानीच्या अंतःपुरात एखादे पान खातांना आढळत; पण जन्मभर नुसती झाडांची पानेच चघळणार्‍या दुसर्‍या बाजीरावाचे एक ब्रह्मावर्तच या राष्ट्र्राने बनावे, हे मला पहावत नाही.’  स्वा. सावरकरांच्या या विचारांना पुन्हा उजाळा देण्याची ही वेळ आहे !

– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी (२५.५.२०२३)


सावरकरांजवळील तीक्ष्ण हत्यार !

‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !’’ गुप्तचरांनी झडती घेतली. काहीच सापडले नाही ! तेव्हा गुप्तचरांचा प्रमुख अधिकारी सावरकरांना म्हणाला, ‘‘क्षमा करा. चुकीच्या बातमीमुळे तुम्हाला त्रास झाला.’’ सावरकर म्हणाले, ‘‘तुम्हाला मिळालेली वार्ता चुकीची नाही. माझ्यापाशी भयंकर घातक हत्यार आहे.’’ खिशातील झरणी (पेन) दाखवून सावरकर म्हणाले, ‘‘हे पहा, ते हत्यार ! यातून निघणारा एकेक शब्द तरुणांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. या शब्दांनी देशभक्तांचे रक्त सळसळते आणि ते राष्ट्र्रासाठी तळहातावर शिर घेऊन लढण्यास सिद्ध होतात !’’

– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी  (२५.२.२०२३)


अंदमानच्या काळकोठडीतील ‘कमला’ !

अंदमानच्या काळकोठडीतील भयाण एकांतात कागद-पेन्सिल वापरण्याचीही अनुमती नसतांना कधी घायपाताचा काटा, तर कधी खापराच्या तुकड्याने, (कधी खिळे आणि कोळसे यांनी) पहारेकर्‍याची नजर चुकवत त्यांनी ‘कमला’ या महाकाव्याचे लेखन काळकोठडीच्या भिंतींवर केले. ते मिटवले जाईल हे जाणून ते पाठ केले. या लेखनासाठी ८-८ दिवस हातकडीने टांगून रहाण्याची शिक्षाही त्यांनी भोगली.

(‘सावरकर टाइम्स’, मे २०१०)

८०० ओळींच्या ‘कमला’मधील फुलबागेचे वर्णन वाचतांना असे लक्षात येते की, सावरकरांनी महाकवी कालिदासालाही मागे टाकले आहे. पत्नीला सोडून देशाच्या रक्षणासाठी बाहेर पडून रणांगणाकडे धावावे लागते. स्वसुखावर तिलांजली देऊन कठोर कर्तव्याची कास धरावी लागते. अशा वीर नायकाच्या कथानकातून सावरकरांनी अप्रत्यक्षपणे स्वतःचे कथानक रंगवले आहे. साहित्याचार्य महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांना हे काव्य स्वा. सावरकरांना ‘महाकवी’ हे पद देण्यास योग्य वाटते.