धर्माभिमानी सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर

कोणत्याही तरुणाच्या पँटच्या खिशात पिस्तुल आणि शर्टच्या वरच्या खिशात गीता (श्रीमद्भगवद्गीता) असावी.’ – स्वातंत्र्यवीर सावरकर  

गीतेचे तत्त्वज्ञान जाणलेले सावरकर !

‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला । मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ।।

अग्नि जाळि मजसि ना खड्ग छेदितो । भ्याड मृत्यु मजसि पाहुनि पळत सुटतो ।।’

‘सावरकरांना लंडनमध्ये पकडून बोटीने भारतात आणले जात होते. फ्रान्सच्या मार्सेलिसहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण ते पकडले गेले. त्यांना बोटीवर खोलीत कोंडले. मुसलमान पहारेकरी नेमले. ‘आता आपला अमानुष छळ होणार’, हे जाणून मनाला वज्रशाली करण्याकरिता त्यांना गीता आठवली. कवचमंत्र म्हणून त्यांनी वरील कविता रचली. त्यातील आशय, तत्त्वज्ञान आणि शब्द गीतेतीलच आहेत.

 ‘अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।’

– श्रीमद्भगवद्गीता (अध्याय २, श्लोक २०) आणि

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।। ’

– श्रीमद्भगवद्गीता (अध्याय २, श्लोक २३)

(अर्थ : हा आत्मा अजन्मा, नित्य, सनातन आणि पुरातन आहे. शरीर मारले गेलेले असतांनाही हा आत्मा मारला जात नाही. या आत्म्याला न शस्त्रे कापू शकतात, न अग्नि जाळू शकतो.)

गीतेच्या अध्यायातील वरील श्लोकाचेच हे प्रतिबिंब आहे. गीतेच्या या शब्दांनी त्या घोर संकटात त्यांचे मन स्थिर आणि युयुत्सू (लढण्याची इच्छा असणारे) झाले अन् छळ करायला आलेल्या पहारेकर्‍यांना रोखण्यात ते यशस्वी झाले ! – भागवताचार्य. वा.ना. उत्पात      


केवळ धर्माभिमानी नव्हे, तर धर्मरक्षणाला प्रेरित करणारे सावरकर !

वर्ष १९२७ मध्ये काढलेल्या पत्रकातील  सावरकर लिहितात, ‘‘आपापल्या गावात जी देवळे आणि धार्मिक स्थाने असतील, त्यांची योग्य निगा राखण्याचे आणि त्यांचे पूर्ण रक्षण करण्याचे आपले कर्तव्य आहे, याची पूर्ण जाणीव लोकांना देऊन कोणत्याही गुंडाला त्या देवदेवतांचा अपमान आणि भ्रष्टाचार करता येऊ नये, असा सर्वकाळ जागता डोळा त्यावर ठेवला पाहिजे.’’


श्रीकृष्णाला आदर्श मानणारे सावरकर !

सावरकर म्हणतात, ‘‘श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघे आपल्या राष्ट्राचे सेनापती, सारथी आणि श्रेष्ठ अधिपती आहेत. मनु आणि श्रीकृष्ण हे नीतीनियम सांगणारे आहेत. श्रीराम आमचे सेनापती आहेत. त्यांनी दिलेले पौरुषयुक्त धडे आपण पुन्हा गिरवूया आणि आपल्या हिंदु राष्ट्र्रास पुन्हा अजिंक्य अन् विजीगिषू करूया. श्रीकृष्णाने केले बहुत आणि सांगितलेही बहुत; पण त्या सर्व कृत्यांत अनन्यसाधारण कृत्य म्हणजे कंसवध ! त्याच्या सर्व उपदेशांत जी अनन्यसाधारण शिकवण त्याने दिली, ती म्हणजे भगवद्गीता !’’


सर्वश्रेष्ठ आनंदप्राप्ती हेच मनुष्याचे ध्येय !

योगशास्त्राची गोडी सावरकरांना तरुण वयात लागली. अंदमानातील काबाडकष्टाचे जीवन आणि आत्महत्येला प्रवृत्त करणारी छळवणूक यांवर त्यांनी योगशास्त्राच्या साहाय्याने मात केली. स्नानानंतर ध्यानधारणा करण्याचा त्यांचा नित्यक्रम असे. योगशास्त्राविषयी ते म्हणतात, ‘‘मानवाला मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान’ असे ज्याचे वर्णन करता येईल, असे एका प्रयोगावर आधारलेले शास्त्र हिंदूंनी पूर्णत्वास नेले आहे, ते शास्त्र म्हणजे योगशास्त्र. योगशास्त्र मनुष्याच्या आंतरिक शक्तीच्या संपूर्ण विकासाचे एक सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. ते वैयक्तिक अनुभवाचे शास्त्र आहे. म्हणून त्यात मतभेदाला जागा नाही. योग आचरणार्‍या मनुष्याला आश्चर्यकारक, इंद्रियातीत आणि उत्कट आनंद प्राप्त होतो. या अवस्थेला योगी ‘कैवल्यानंद’ म्हणतात, वज्रायनी ‘महसुख’ म्हणतात, अद्वैती ‘ब्रह्मानंद’ म्हणतात आणि भक्त ‘प्रेमानंद’ म्हणतात. हा सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त करून घेणे हे मनुष्याचे – मग तो हिंदु असो वा अहिंदु, आस्तिक असो वा नास्तिक असो – सर्वश्रेष्ठ ध्येय आहे.’’

(संदर्भ – समग्र सावरकर वाङ्मय, खंड ६)


हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी अध्यात्मधारणा बाळगा !

पू. संदीप आळशी

स्वतःला विद्वान समजणारे काही जण स्वा. सावरकर हे नास्तिक असल्याचे मानतात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोळाव्या वर्षी अष्टभुजादेवीसमोर प्रतिज्ञा करणारे, उपनिषदांचा गाढा अभ्यास असणारे, पतितपावन मंदिराची स्थापना करणारे, रत्नागिरीला असतांना ‘अखिल हिंदू गणेशोत्सव’ चालू करणारे आणि गोरक्षणाविषयी जाज्ज्वल्य विचार असणारे स्वा. सावरकर हे नास्तिक कसे असू शकतील ? मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारल्यानंतर त्यांना परत आगनावेवर (बोटीवर) पकडून आणल्यावर दोन इंग्रज पोलीस अधिकारी रात्री झोडपून काढणार असल्याचे कळल्यावर स्वा. सावरकरांना जे काव्य स्फुरले, ते गीतेतील तत्त्वज्ञानावर आधारित होते. अध्यात्मधारणा वृत्तीत मुरलेली असल्याविना गीतेतील हे तत्त्वज्ञान एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत कुणाच्या तोंडून बाहेर पडू शकेल ? आज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढणार्‍या समस्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंनाही भीषण संघर्षाला सामोरे जावे लागणारच आहे. त्यासाठी स्वा. सावरकरांसारखी अध्यात्मधारणा बाळगण्याचा आदर्श ठेवूया !’

– (पू.) संदीप आळशी (१४.५.२०१७)


सावरकरांची गोमातेला मारण्याविषयीची मते मुळातून वाचा !

‘गाय मारलेली केव्हा चालेल ?’, हे सांगतांना स्वा. सावरकर लिहितात, ‘‘पूर्वी हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी मुसलमान गायीचे कळप पुढे ठेवून आक्रमण करीत. त्या गायींचा वध आपल्या हातून होऊ नये; म्हणून हिंदु राजे त्यांची शस्त्रे म्यान करीत. हिंदूंच्या या सद्गुणविकृतीमुळे मुसलमानांना विजय मिळवणे सोपे व्हायचे. जी गाय शत्रूला साहाय्यकारी ठरते, ती गाय मारली तरी चालेल.’’ त्या वेळी ‘पाच-पन्नास गायी मेल्या असत्या; पण आज भारतात होणारी लाखो गायींची कत्तल वाचली असती’, असे सावरकरांचे सांगणे होते. ‘आज आपण पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला, तर तेथील अनेक गायी मरतीलच ना ?’ असा विचारही सावरकरांनी बोलून दाखवला.  स्वा. सावरकरांची वाक्ये संदर्भहीनपणे घेऊन बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यांचा अपवापर केला, उदा. ‘गायीला मारा’, हे पूर्ण वाक्य आहे, असे भासवले. प्रत्यक्षात वाक्य असे आहे – ‘गायीच्या आड शत्रू लपला असेल, तर गायीला मारा आणि नंतर त्याला मारा.’


स्वा. सावरकरांनी वर्णिलेले भारतभूमीचे श्रेष्ठत्व !

‘ही भूमी वसिष्ठ आदी ऋषींनी अभिमंत्रित केलेल्या जलाने पवित्र झाली आहे. महर्षी व्यासांची वाणी आणि कृष्णाच्या गीतेचे ज्ञान हिचे उत्कट स्वरूप आहे. रामायण आमचा क्षीरसागर आहे. दमयंती, सावित्री, गार्गेयी आणि सीता यांनी या भूमीत जन्म घेतला. कणाद, कपिल, भास्कर, आर्यभट्ट, वराहमिहीर इत्यादी अन्वेषक; गौतम, महावीर, शंकर, रामानुज, नानक, दयानंद, विवेकानंद यांसारखे धर्मवेत्ते या धरतीच्या यशगाथेने दिग्विजयी धर्मसम्राट बनले. चित्तोडचे महाराणा प्रताप, बुंदेलचे छत्रसाल, बंगालचे प्रतापादित्य, रायगडचे शिवाजी महाराज, पुण्याचे पेशवा, पानिपतचे रक्षामैदान, सिंहगडची उभी शिळा, ज्ञानेश्वरांची लेखणी, समर्थ रामदास, तसेच योद्धा, तत्त्ववेत्ता, शास्त्रविद, कवी, देशभक्त, राजनीती धुरंधर इत्यादी सगळे मिळून जिचे स्तोत्र गात आहेत, त्या महान भूमीला आमचे वंदन आहे, शत-शत अभिनंदन आहे.’

(सावरकर टाईम्स, डिसेंबर२००९)


संस्कृतीचा अभिमान अंगी बाणवलेले सावरकर ! 

लंडनमध्ये विजयादशमी, शिवजयंती, गुरुगोविंद जयंती आणि १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा सुवर्ण महोत्सव चालू करून सावरकरांनी इंग्लंडमध्ये रहाणार्‍या हिंदु लोकांना स्वाभिमान शिकवला !

– डॉ. प्रल्हाद कुलकर्णी (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक, २०१०)


इतिहासाभिमानी सावरकर !

ज्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘हिंदु म्हणजे सतत पराभवाचे जिणे. त्याची लाज वाटली पाहिजे.’ त्या वेळी बाणेदारपणे ‘हिंदु राष्ट्राची ३ सहस्र वर्षांची तेजोमय परंपरा सांगून स्वाभिमान जागृत करणारे उत्तर देत सावरकरांनी प्रतिप्रश्न केला, ‘‘हिंदु राष्ट्राचे विरोधक आणि आक्रमक ग्रीक, शक, हूण, कुशाण, पर्शियन हे हिंदुस्थानात कुठे आहेत ? त्यांचा एकही प्रतिनिधी आता उरला नाही !’’


विश्वातील ज्ञानाएवढे आमचे धर्मपुस्तक विस्तृत !

ख्रिस्ती, मुसलमान आणि काही हिंदु ‘हिंदूंचा एक असा धर्मग्रंथ नाही’, असे सांगत. त्यांना प्रत्युत्तर म्हणून वर्ष १९३७ मध्ये केलेल्या भाषणात सावरकर म्हणतात, ‘‘असे असल्यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्त्व कोणत्याही पुस्तकाच्या दोन पुठ्ठ्यांत सामावू शकणार नाही. या विश्वाच्या दोन पुठ्ठ्यांमध्ये जितके सत्य आणि ज्ञान पसरले आहे, तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत आहे !’’

– दैनिक ‘सनातन प्रभात’


धर्म कुणाला सुटला आहे ?

धर्म म्हणजे केवळ पारमार्थिक गोष्टींची चर्चा, केवळ द्वैत-अद्वैताचे वादविवाद किंवा चेतन-अचेतन वस्तूंचा शोध नव्हे. धर्म म्हणजे व्यवहार, धर्म म्हणजे इतिहास, धर्म म्हणजे राष्ट्र्र आणि हा धर्म कोणाला सुटला

आहे ? इंग्लंडचा राजा प्रॉटेस्टंट नसला, तर त्याला गादीचे त्यागपत्र द्यावे लागते. अमेरिकेच्या प्रेसिडेंटला प्रॉटेस्टंट बायबलची शपथ घ्यावी लागते. मध्यपूर्वेतील प्रत्येक लहान लहान राष्ट्र्रही धर्मप्रधान आहे. आम्ही जग पाहून आलेले लोक आहोत. मनुष्य धर्मातीत राहूच शकत नाही. धर्म हे प्रचंड सामर्थ्य आहे. निधर्मी असलेल्या स्टालीनलाही हे मान्य करावे लागले.

– स्वा. सावरकर