६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नंदा खंडागळे यांना ‘स्वतःचा सूक्ष्म अहं वाढल्यामुळे साधनेची हानी झाली’, हे लक्षात आल्यावर त्यांनी गुरुमाऊलीच्या चरणी केलेली क्षमायाचना !   

सौ. नंदा खंडागळे

१. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर साधना, भाव, भक्ती आणि ईश्वरप्राप्ती या गोष्टी समजणे

‘देवा (प.पू. गुरुमाऊली, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला, त्या वेळी मी अज्ञानी, अडाणी आणि अबोल होते. तेव्हा मला केवळ देवाविषयी ‘चांगले केले, तर पुण्य मिळते आणि वाईट केले, तर पाप लागते’, एवढेच ठाऊक होते. देवा, तू माझ्या जीवनात आलास आणि मला अध्यात्म, भाव, भक्ती शिकवलीस अन् ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवलास. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी ‘काय करू अन् काय नको ?’, अशी अवस्था झाली. तेव्हा माझ्या मनात केवळ एकच विचार होता, ‘ईश्वरप्राप्ती’ !

२. साधक आणि संत यांचा सत्संग मळून साधनेला प्रोत्साहन मिळणे

देवा, तूच मला संत आणि साधक यांचा सत्संग दिलास. त्यांच्या माध्यमातून तू माझ्या घरी येत राहिलास आणि मला सतत मार्गदर्शन करत राहिलास. देवा, तू मला संतांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत राहिलास. त्यामुळे माझ्या मनाला साधना करण्याची उभारी मिळाली. देवा, तू मला भेटलास आणि मी माझे ‘मी’पण हरवून बसले. तो आनंद वेगळाच होता.

३. सूक्ष्म अहं वाढल्याचे न कळणे

३ अ. सूक्ष्म अहं वाढून अधोगती होणे : देवा, तू मला सगळे शिकवत होतास; पण ‘माझा सूक्ष्म अहं केव्हा वाढला ?’, ते मला कळलेच नाही. आधी ‘मी, माझे’, असे करतांना मला माझ्यातील तामसिक अहं कळत होता; पण सूक्ष्म अहं वाढलेला लक्षातच आला नाही. ‘मी कशी वेगळी आहे ? मला सर्व कसे कळते ?’, असे सांगतांना ‘मी माझी अधोगती कधी करून घेतली ?’, हे मला कळलेच नाही.

३ आ. साधकांशी बोलतांना सूक्ष्म अहं वाढणे : देवा, साधकांशी बोलतांना माझा भाव आणि बोलणे वेगळे असायचे. संतांशी बोलतांना ‘मी किती चांगली आहे ?’, असा देखावा करतांना स्वतःलाच फसवत राहिले. ते मला कधी कळलेच नाही.

३ इ. ‘देवा, मी तुझी आहे’, असे म्हणत कुटुंबियांवर अधिकार गाजवत राहिले. ‘मला सर्व समजते’, या विचाराने स्वतःलाच फसवत राहिले.

३ ई. सेवा करतांना अहं वाढणे : देवा, तू दिलेली सेवा करण्याचा आनंद न घेता ‘मी कशी चांगली सेवा करते ?’ या विचारात आणि इतर साधक सेवेला आले नाहीत; म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करत सेवा केली. यातून मी अहं वाढवून साधनेची हानी करून घेतली.

४. क्षमायाचना

‘देवा, तू या मूढ जिवाला सद्बुद्धी दे. तू देतच आहेस; पण माझ्यातील अहंमुळे मी तुझ्याकडून शिकू शकले नाही. देवा, माझे पुष्कळ चुकले रे ! माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी दोन्ही कान पकडून तुझ्या चरणी क्षमा मागते. भगवंता, हा अज्ञानी जीव केवळ आणि केवळ तुझाच आहे.’

– सौ. नंदा खंडागळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५३ वर्षे), नागपूर. (२८.१२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.