चौघांची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता शासनाधीन !

सेवा विकास बँकेतील अपव्यवहार प्रकरण

पिंपरी (पुणे) – येथील ‘सेवा विकास बँके’तील अपव्यवहार प्रकरणी माजी संचालक, तसेच माजी उपमहापौर अमर मूलचंदानी, रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय आरहाना यांसह सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी आणि त्यांच्या कुटुंबियांची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने शासनाधीन केली आहे. आरहाना यांच्या विरोधात कॉसमॉस बँकेची २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. ‘ईडी’ने त्यांना १० मार्च या दिवशी कह्यात घेतले.

सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या विरोधात ‘ईडी’ने ही कारवाई केली होती. त्यांच्या कुटुंबियांच्या निवासस्थानी, तसेच कार्यालयावर ‘ईडी’ने धाड टाकली होती. त्या वेळी त्याला विरोध करून अधिकार्‍यांना असहकार्य केल्याप्रकरणी, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मूलचंदानी यांच्या विरोधात ‘ईडी’ने स्वतंत्र गुन्हा नोंद केला होता. मूलचंदानी यांनी अनधिकृतपणे कर्ज संमत करून अपव्यवहार केला होता. या अपव्यवहारात आरहाना, सूर्यवंशी, भोजवानी सामील असल्याचे ‘ईडी’च्या अन्वेषणात उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. त्यांची १२१ कोटी ८१ लाख रुपयांची मालमत्ता शासनाधीन केली आहे.