कोल्हापूर – बिहार राज्यातून आलेल्या ६३ अल्पवयीन मुसलमान मुलांना घेऊन आजरा येथे जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी १७ मे या दिवशी पकडला आहे. ही सर्व मुले ७ ते १४ वर्षे वयोगटातील आहेत. बिहार येथून रेल्वेतून ही मुले कोल्हापूर येथे आली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक अन्वेषणात ही मुले आजरा येथील एका मदरशात शिक्षणासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाकडे अधिक माहिती विचारली असता त्याला कोणतीही समर्पक उत्तरे देता आली नाहीत. काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिक अन्वेषण चालू आहे. (अशा प्रकारची माहिती प्रथम हिंदुत्वनिष्ठांनाच कशी मिळते ? – संपादक)
ट्रकचालक पसार !
या संदर्भात पोलिसांनी संबंधित शिक्षण संस्थेकडे विचारणा केली असता ही सर्व मुले शिक्षणासाठी आल्याचे सांगितले. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे एक कार्यकर्ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘‘आम्हाला या मुलांविषयी संशय आल्यावर आम्ही ट्रकचालकाकडे अन्वेषण केले असता तो घटनास्थळावरून पळून गेला. या मुलांकडे असणारे रेल्वेचे तिकीट आणि ते सांगत असलेले येण्याचे ठिकाण यात फरक आढळला. ही मुले विद्यार्थी आहेत, असे सांगण्यात आले; मात्र त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नाहीत.’’
संपादकीय भूमिकाजर हे संशयास्पद नाही, तर ट्रकचालक पळून का गेला ? मुले विद्यार्थी असल्याची योग्य कागदपत्रे कुणी का सादर करू शकत नाही ? |