लाच घेतल्‍याप्रकरणी विटा (जिल्‍हा सांगली) नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी विनायक औंधकर कह्यात !

प्रतीकात्मक छायाचित्र

विटा (जिल्‍हा सांगली) – बांधकामाचा परवाना देण्‍यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतांना मुख्‍याधिकारी विनायक औंधकर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या जाळ्‍यात सापडले. केवळ ३ मासांपूर्वी त्‍यांचे विटा नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदी स्‍थानांतर झाले होते. औंधकर यांच्‍यावर कारवाई झाल्‍यावर नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्‍यक्‍त केला. औंधकर यांनी विटा शहरातील एका बांधकाम व्‍यावसायिकाकडे त्‍याच्‍या ५ मजली इमारतीच्‍या बांधकाम अनुमतीसाठी अडीच लाख रुपयांच्‍या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २ लाख रुपये देण्‍याचे ठरले. या संदर्भात संबंधित बांधकाम व्‍यावसायिकाने सांगलीच्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्‍ट केली. त्‍यानंतर औंधकर यांना १६ मे या दिवशी लाचलुचपत विभागाने सापळा रचून कह्यात घेतले. विटा पोलीस ठाण्‍यात औंधकर यांच्‍यावर भ्रष्‍टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. यापूर्वी औंधकर हे कोल्‍हापूर येथे महापालिकेत साहाय्‍यक आयुक्‍त म्‍हणून कार्यरत होते. तेथेही त्‍यांची कारकीर्द वादग्रस्‍त ठरली होती.

संपादकीय भूमिका

भ्रष्‍टाचारग्रस्‍त भारत ! अशा लाचखोर अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केल्‍यासच इतरांवर जरब बसेल !