श्रीरामनवमी उत्सवाच्या वेळी दंगली करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

हुपरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना  श्री. किरण दुसे

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – यंदाच्या वर्षीही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, देहली, कर्नाटक, बंगाल, झारखंड आदी अनेक राज्यांत श्रीरामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करून हिंसाचार घडवण्यात आला. श्रीरामनवमीच्या दिवशी झालेले आक्रमण हे सुनियोजित षड्यंत्र असून या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत करावी आणि सार्वजनिक संपत्तीच्या झालेल्या हानीची भरपाई दोषींकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले. हुपरी येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

श्री. किरण दुसे पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरुष यांचा सामाजिक माध्यमांद्वारे अवमान करण्याचा प्रकार समाजकंटकांकडून चालू आहे. या प्रकरणी कठोर कारवाई होतांना दिसत नाही. संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीनंतर समाजकंटकांकडून नुकतीच अकोला येथेही दंगल, जाळपोळ करण्याचा प्रकार झाला. तरी अशा सर्वांवर या प्रकरणी कठोर कारवाई अपेक्षित आहे.

या वेळी भाजपचे श्री. सुदर्शन खाडे, ‘वीर शिवा काशीद प्रतिष्ठान’चे श्री. नीळकंठ माने, हिंदुत्वनिष्ठ श्री. विनायक विभूते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विरामजी बहादुरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शिवाजीराव मोटे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सर्वश्री मोहन वाईंगडे, राजेश भोजे, उमेश दैने, ऋषिकेश साळी, प्रशांत साळुंखे याचसमवेत यळगुड, रेंदाळ, तळंदगे, हुपरी येथील धर्मप्रेमी उपस्थित होते. आंदोलन झाल्यावर हुपरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई, पोलीस हवालदार सचिन सावंत यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.