महाराष्ट्रातील २ बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार

नवी देहली – महाराष्ट्रातील ‘मुंबई बंदर प्राधिकरण’ आणि ‘जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण’ या दोन बंदरांना वर्ष २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कार्याविषयी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी १० मे या दिवशी ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले. येथील इंडिया इंटरनॅशनल केंद्रामध्ये केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ‘हरित सागर’ ग्रीन पोर्ट मार्गदर्शक तत्त्वाचे लोकार्पण करण्यात आले, तसेच ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने देशभरातील १२ बंदरांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात देशभरातील प्रमुख बंदरांना आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत निवडक विविध परिचालन मापदंडांच्या आणि त्यांच्या अपवादात्मक कामगिरीविषयी, तसेच सर्वाधिक वाढीव सुधारणा नोंदवलेल्या बंदरांना सन्मानित करण्यात आले. वर्ष २०२२-२३ मधील त्यांच्या एकूण कामगिरीच्या आधारावर ही क्रमवारी देण्यात आली. प्रमुख बंदरांमध्ये निष्पक्ष आणि निरोगी स्पर्धा निर्माण करणे अन् येत्या वर्षात त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्याची कल्पना या पुरस्कारामागे आहे.