‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीकृष्णच आहेत’, याची साधकाला आलेली प्रचीती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. स्वप्नात श्रीकृष्णाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांभोवती संरक्षककवच निर्माण केल्याचे दृश्य दिसणे

‘वर्ष १९९९ मध्ये एका रात्री २.४५ वाजता मला एक स्वप्न पडले. त्यात मला पुढील दृश्य दिसले, ‘गुरुदेवांनी श्रीकृष्णाच्या रूपात डाव्या हाताने अनेक साधकांभोवती संरक्षककवच निर्माण केले आहे. या वेळी गुरुदेवांचे रूप पुष्कळ तेजस्वी दिसत आहे. त्यांचा क्षात्रभाव जागृत झाला आहे.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वरील स्वप्न सांगून ‘आपण साक्षात् श्रीकृष्ण आहात’, असे मला वाटते. ते खरे आहे का ?’, असे विचारल्यावर त्यांनी त्या प्रश्नाचे अप्रत्यक्षरित्या होकारार्थी उत्तर देणे

डॉ. रविकांत नारकर

नंतर मी ते स्वप्न माझी पत्नी सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर हिला सांगितले. तिने ते तेवढेसे मनावर घेतले नाही आणि ‘याविषयी उत्तरदायी साधकांना विचारून घ्या’, असे ती म्हणाली. त्याच वेळी गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) कुडाळ येथे येऊन साधकांना मार्गदर्शन करणार असल्याने आम्ही तेथे गेलो. स्वप्नात दिसलेले दृश्य एका कागदावर रेखाटून मी ते स्वप्न गुरुमाऊलींना सांगितले आणि विचारले, ‘‘आपण साक्षात् श्रीकृष्ण आहात’, असे मला वाटते. ते खरे आहे का ?’’ त्या वेळी गुरुदेवांनी सर्व साधकांना विचारले, ‘‘हे ऐकून काय वाटले ?’’ तेव्हा साधकांनी सांगितले, ‘‘हे ऐकत असतांना अंगावर रोमांच उभे राहिले आणि आमचा भाव जागृत झाला.’’ तेव्हा गुरुदेव माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘‘मिळाले ना उत्तर ?’’

३. वरील प्रसंगामुळे गुरुदेवांवरील श्रद्धा दृढ होऊन उत्तर भारतात अध्यात्मप्रसारासाठी जाण्याची मनाची सिद्धता होणे

गुरुमाऊलींनी मला स्वप्नात श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन दिले आणि ‘पुढे आपत्काळ कसा येणार आहे ?’, हे दाखवून ‘गुरुमाऊलीच साधकांचे रक्षण करून ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणार आहेत’, याची प्रचीती दिली. त्यामुळे गुरुदेवांवरील माझी श्रद्धा दृढ होऊन पुढे उत्तर भारतात अध्यात्मप्रसारासाठी जाण्याची माझ्या मनाची सिद्धता झाली. ‘धर्मकार्यात गोप-गोपींप्रमाणे काठी लावण्यासाठी माझ्या मनाची सिद्धता करून घेणे आणि डबक्यातून बाहेर काढून समुद्रात पोहायला शिकवणे’, हे ईश्वराविना दुसरे कुणी करू शकते का ?’

– डॉ. रविकांत गोविंद नारकर, पडेल, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक