प्रश्न : काही वेळा संत काही साधकांना ‘एकाच वेळी सर्व उपचारपद्धतींनुसार औषधे चालू ठेवा’, असे का सांगतात ? ‘एकाच रुग्णाला एकाच लक्षणासाठी अनेक उपचारपद्धतींनुसार औषधे चालू असणे’, यामध्ये रुग्ण आणि डॉक्टर दोघांचाही वेळ, पैसा आणि श्रम वाया जात नाही का ?
उत्तर : ‘एखाद्या रुग्णाच्या संदर्भात विविध उपचारपद्धतींच्या तज्ञांनी एकत्रितपणे विचार करून स्वतःच्या उपचारपद्धतीचा अहंकार न ठेवता त्या रुग्णासाठी सर्वोत्तम उपचार देणे’ आदर्श आहे. रुग्णाचा विकार समजून घेऊन एका वेळी कोणत्याही एकाच उपचारपद्धतीनुसार उपचार करता येऊ शकतात किंवा एकाच वेळी वेगवेगळ्या लक्षणांसाठी वेगवेगळ्या उपचारपद्धतींचे साहाय्य घेता येऊ शकते. काही वेळा एका उपचारपद्धतीनुसार आणि त्यानंतर दुसर्या उपचारपद्धतीनुसार उपचार करता येऊ शकतात. प्रत्येक रुग्णानुसार यात पालट होऊ शकतो; परंतु असे करण्यासाठी सर्व उपचारपद्धतीच्या तज्ञांमध्ये समन्वय असावा लागतो. स्वतःच्या उपचारपद्धतीसह अन्य उपचारपद्धतींमध्ये काय चांगले आहे, याची जिज्ञासा असावी लागते. साधक वैद्यांमध्ये हे गुण निर्माण होऊन त्यांनी वर दिलेल्या आदर्श पद्धतीनुसार उपचार देणे संतांना अपेक्षित असते. हे गुण निर्माण झालेले साधक वैद्य एकमेकांशी समन्वय करून रुग्णाला योग्य ते उपचार देऊ शकल्यास रुग्णाला सर्व उपचारपद्धतींनुसार उपचार करण्याची आवश्यकता नसते. काही वेळा साधक वैद्यांमध्ये हे गुण निर्माण झालेले नसतात. समाजातील वैद्यांमध्ये असे गुण असतीलच याची निश्चिती नसते. ‘साधक विकारमुक्त व्हावेत’, अशी तळमळ असल्यामुळे संत काही साधकांना ‘सर्व उपचारपद्धतींनुसार उपचार चालू ठेवा’, असे सांगतात.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२३)