|
फरीदाबाद – एखादी व्यक्ती व्यसनाधीन होण्याची कारणे ३० टक्के शारीरिक, म्हणजे व्यसनाधीन पदार्थांवर अवलंबून, तर ३० टक्के कारणे मानसिक आणि ४० टक्के कारणे ही आध्यात्मिक स्वरूपाची असतात. तसेच ‘एक्झिमा’ या आजाराची ३० टक्के प्रकरणे ही केवळ आध्यात्मिक स्वरूपाची असतात. अशा वेळी अध्यात्मशास्त्रानुसार योग्य साधना आणि नामजप, प्रतिदिन १५ मिनिटे मिठाच्या पाण्यात पाय ठेवण्याचे उपाय केले, तर व्यसने अन् विकार यांवर लवकर मात करता येते, असे उद्गार ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी काढले. फरीदाबाद येथे झालेल्या ‘सी २० इंटिग्रेटेड होलिस्टिक हेल्थ समिट’मध्ये ‘अध्यात्माद्वारे व्यसनाधीनता आणि एक्झिमा यांवर मात कशी करता येते ?’, या विषयावर शोधनिबंध सादर करतांना ते बोलत होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत श्री. शॉन क्लार्क यांच्यासह विश्वविद्यालयाच्या संशोधन समन्वयक सौ. श्वेता क्लार्क यांनी सहभाग घेतला. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे संशोधन केले. यापूर्वी २० ते २२ मार्च २०२३ या कालावधीत नागपूर येथे झालेल्या ‘सी २० इन्सेप्शन कॉन्फरन्स’मध्येही ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चा सहभाग होता.