छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा येथे मंत्रीमंडळाची १ दिवसीय बैठक बोलावण्याची मागणी करत एका तरुणाने महाराष्ट्रदिनी येथील जिल्हा परिषदेच्या टॉवरवर चढून आंदोलन केले, तसेच जोपर्यंत लेखी हमी दिली जाणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. पोलिसांकडून या तरुणाला खाली उतरण्याचे आवाहन करण्यात आले; पण तो आपल्या मागणीवर ठाम होता. शेवटी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन तरुणाची समजूत काढली आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली. त्यानंतर १ घंट्यानंतर हा तरुण खाली आला. बाबा उगले असे तरुणाचे नाव असून तो जालना जिल्ह्यातील आहे.
यापूर्वी मराठवाड्यात शेवटची मंत्रीमंडळाची बैठक वर्ष २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकही मंत्रीमंडळाची बैठक मराठवाड्यात होऊ शकली नाही.
१७ सप्टेंबरला मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होणार ! – संजय शिरसाट, आमदार
आमदार शिरसाट म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मंत्रीमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे घेतली गेली पाहिजे, या मताचा मी आहे. विभागात बैठक घेतल्याने मराठवाड्यावरील अन्याय दूर होईल. त्यामुळे मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक व्हायला हवी, यासाठी मी प्रयत्न करीन, तसेच १७ सप्टेंबर या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची बैठक होईलच, असेही त्यांनी सांगितले.