५६ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नेरुळ, नवी मुंबई येथील कु. अनुश्री संदीप शर्मा (वय १ वर्ष) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अनुश्री शर्मा ही या पिढीतील एक आहे !

कु. अनुश्री शर्मा

ज्येष्ठ कृष्ण नवमी (२२.६.२०२२) या दिवशी कु. अनुश्री संदीप शर्मा हिचा प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. दर्शना शर्मा (अनुश्रीची आई),  नेरुळ, नवी मुंबई.

सौ. दर्शना शर्मा

१ अ. गर्भारपण

१ अ १. गर्भारपणात ६ मासांपर्यंत सर्व वैद्यकीय चाचण्या व्यवस्थित असणे : ‘गर्भधारणा झाल्यापासून मला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे ‘दिवसभर झोपून रहावे’, असे वाटायचे. त्या वेळी ताई (सौ. अमृता जुनघरे) म्हणायची, ‘‘दैवी बाळ असल्यामुळे तुला ते चैतन्य सहन होत नसावे.’’ मी भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त’, हा नामजप सतत चालू ठेवायचे. ६ मासांपर्यंत सर्व वैद्यकीय चाचण्या व्यवस्थित होत्या.

१ अ २. बाळाला (Duodenal atresia) लहान आतड्याचा त्रास असू शकतो, हे समजल्यावर सर्वांना काळजी वाटणे, संतांनी सांगितलेला नामजप करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून सतत सतत प्रार्थना करणे : सातव्या मासात सोनोग्राफीची चाचणी (शरिराच्या आतील अवयवांची पहाणी करण्याची एक चाचणी) केली असता त्यात गर्भाशयातील द्रवाचे प्रमाण (Amniotic fluid) अधिक असल्याचे लक्षात आले. हे केवळ गर्भधारणेमध्ये काही गुंतागुंत असते, तेव्हाच अधिक असते. पुन्हा ‘सोनोग्राफी’ केल्यावर बाळाच्या पोटात Double bubble sign (‘सोनोग्राफी’मध्ये ओटीपोटात हवेने भरलेले २ बुडबुडे दिसणे) दिसत असल्याचे लक्षात आले. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘बाळाला (Duodenal atresia – लहान आतड्याचा पहिला भाग (ड्युओडेनम) योग्यरित्या विकसित झालेला नसणे)’, आतड्याचा त्रास असू शकतो. त्यामुळे बाळ पोटात पाणी पीत नाही; म्हणून तुझ्या पोटात द्रवपदार्थाचे (Fluid) प्रमाण वाढत आहे. Duodenal atresia ची ३० टक्के मुले ही मानसिक रुग्णही असू शकतात.’’ ते ऐकून सगळेच पुष्कळ चिंतेत होते. तेव्हा आईने सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडून नामजप विचारून घेतला आणि मी अन् माझे यजमान यांना करण्यास सांगितला. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बालपणीच्या छायाचित्राकडे पाहून सतत प्रार्थना करत होते.

१ आ. प्रसूती : गर्भारपणात अनेक अडचणी येऊनही त्या आपोआप सुटत होत्या. त्या वेळी आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘आठव्या मासात नैसर्गिकपणे प्रसूती न झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागेल.’’ माझी प्रसूती ८ व्या मासात होऊन ती नैसर्गिकरित्या झाली.

१ इ. प्रसूतीनंतर : अनुश्रीचा जन्म ८ व्या मासात झाला. तेव्हा तिचे वजन दीड किलो होते. जन्म होताच आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तिच्याकडे बघून ‘ती व्यवस्थित (नॉर्मल) आहे’, असे वाटते. ‘तिला कुठल्याही प्रकारचा काही मानसिक त्रास आहे’, असे वाटत नाही.’’ जन्म होताच तिला Duodenal atresia या शस्त्रक्रियेसाठी दुसर्‍या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले.

१ ई. अनुभूती – बाळाला शस्त्रक्रियेसाठी अतिदक्षता विभागात ठेवल्यावर ‘तिचा सांभाळ सूक्ष्मातून परात्पर गुरु पांडे महाराज करत आहेत आणि ‘अतिदक्षता विभाग म्हणजे ध्यानमंदिरच आहे’, असे दिसणे : अनुश्रीची शस्त्रक्रिया झाल्यावर तिला अतिदक्षता विभागात ठेवले होते. मी प्रतिदिन अतिदक्षता विभागातून अनुश्रीला भेटून बाहेर यायचे आणि तिला काचेतून बघायचे. माझ्या मनात प्रतिदिन ‘ती एकटी कशी रहात असेल ?’, असा विचार येत होता. एके दिवशी मी काचेतून बघत असतांना मला परात्पर गुरु पांडे महाराज आसंदीवर बसलेले दिसले आणि ते मला वर हात करून सांगत होते, ‘तू जा. मी इथे आहे.’ तेव्हा मी पुष्कळ अचंबित झाले. त्यानंतर प्रतिदिन मी काचेतून अनुश्रीच्या समवेत परात्पर गुरु पांडे महाराजांना बघून शांत मनाने घरी जात असे. तो अतिदक्षता विभाग नसून ‘ते देवद आश्रमाचे ध्यानमंदिर आहे’, असे मला दिसायचे आणि ‘तिच्या सभोवताली सद्गुरु अन् संत आहेत’, असेही मला दिसायचे.’

१ उ. विशेष घटना 

१. ‘अनुश्रीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिला दूध द्यायला सांगितले. तेव्हा ‘तिला गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रसाद मिळाला’, असे मला वाटले.

२. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी स्वत:च गायलेले ‘गुरुकी सेवा’ हे भजन लावले. तेव्हा अनुश्री ते भजन ऐकत होती. त्या वेळी तिच्या डोळ्यांतून प्रथमच अश्रू आले. तेव्हा ‘अनुश्री सद्गुरु अनुताईंना आधीपासून ओळखत आहे’, असे मला वाटले.’

१ ऊ. अनुश्रीची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

१ ऊ १. देवाची आवड

अ. तिने पहिला शब्द ‘दत्त’ हा उच्चारला.

आ. ती देवासमोर बसली की, टाळ्या वाजवते.

इ. अनुश्री भजन शांतपणे ऐकते.

ई. ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे पाहून बोलत असते’, असे वाटते.

उ. अनेक वेळा ‘अनुश्री नामजप करत आहे’, असे वाटते.

ऊ. मुंबई आणि पनवेल येथे नामदिंडी काढण्यात आली होती. तेव्हा मी तिला घेऊन गेले असता ती पूर्णवेळ शांत होती.

ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळीही अनुश्री शांत होती.

२. श्री. संदीप शर्मा (अनुश्रीचे वडील) नेरुळ, नवी मुंबई.

श्री. संदीप शर्मा

२ अ. सर्व भार देवावर टाकल्यामुळे ताण न येणे : ‘सौ. दर्शनाला सातव्या मासात ‘बाळाला त्रास आहे’, असे समजल्यावर मी सगळे देवावर सोडून दिले. ‘बाळ जसे असेल, तसे ‘परात्पर गुरुदेवांचा प्रसाद आहे’, असे म्हणून स्वीकारायचे’, असे मी ठरवले. मी प्रतिदिन सौ. दर्शनाला तीर्थ बनवून देत होतो. ही कृती माझ्याकडून आपोआप होत होती. त्या काळात मला पैशांचा किंवा कार्यालयीन (ऑफिसच्या) कामाचा जराही ताण आला नाही.’

३. सौ. विद्यागौरी रतन गुजर (अनुश्रीची आजी, आईची आई)(आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे), नवी मुंबई

३ अ. ‘अनुश्रीला परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले आहे’, असा भाव ठेवणे : ‘अनुश्री अतिदक्षता विभागात असतांना ‘परात्पर गुरुदेव तिच्या समवेत आहेत आणि तेच तिची काळजी घेत आहेत’, असे मला वाटत होते. या सर्व कालावधीमध्ये परात्पर गुरुदेवांनी मला बळ दिले होते. मी ‘तिला गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले आहे आणि तेच तिची काळजी घेणार आहेत’, असा मी भाव ठेवला होता. अनुश्रीचे वजन २ किलो होईपर्यंत तिला घरी पाठवले नव्हते. त्या वेळी ‘परात्पर गुरुमाऊली तिची सर्वतोपरी काळजी घेत होते आणि जन्म होताच देवाने तिचे प्रारब्ध न्यून केले’, असे मला वाटले. त्या कालावधीत आम्हाला सर्वांच्या माध्यमातून साहाय्य मिळत होते.’

४. श्री. रतन गुजर (वय ६५ वर्षे)(अनुश्रीचे आजोबा, आईचे वडील), नवी मुंबई

४ अ. देवच ‘सगळे प्रश्न सोडवत आहे’, असे सतत वाटून कृतज्ञता व्यक्त होणे : ‘अनुश्रीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘आता ती कसा प्रतिसाद देते, यावर सर्व अवलंबून आहे.’’ गुरुदेवांची कृपा की, ती प्रत्येक कृतीला योग्य प्रतिसाद देत होती. देवाच्या कृपेने मला सकारात्मक रहाता आले. तेव्हा ‘देवच सगळे प्रश्न सोडवत आहे’, असे वाटून माझ्याकडून सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.’

५. सौ. अमृता जुनघरे (अनुश्रीची मावशी), पनवेल, जिल्हा रायगड.

५ अ. अनुश्रीला दुसर्‍या रुग्णालयात हलवतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले तिच्या समवेत आहेत’, असे जाणवणे : ‘अनुश्रीचा जन्म झाल्यावर तिला दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले. त्या वेळी ‘तिला घेऊन रुग्णवाहिकेमधून जात असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले तिच्या समवेत आहेत’, असे मला जाणवत होते आणि माझ्याकडून सतत प्रार्थना होत होती.

५ आ. तिला बघितल्यावर आम्हाला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची आठवण होते.’ 

‘गुरुमाऊली, या जिवाला तिच्या जन्माच्या आधीपासून आपणच सांभाळत आहात. तुम्हीच कर्ता आणि करविता आहात. तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. दर्शना शर्मा (अनुश्रीची आई), नेरुळ, नवी मुंबई.

(१७.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक