|
मुंबई – पुण्यातील एल्गार परिषद आणि माओवादी संबंधांच्या प्रकरणातील आरोपी तथा मुंबई येथील घरी नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विशेष न्यायाधिशांचा पूर्वीचा आदेश बाजूला ठेवला होता आणि नवलखा यांच्या जामीन अर्जावर नव्याने सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते.
आतंकवाविरोधी पथकाच्या यंत्रणांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, गौतम नवलखा हे नबी फाय यांच्या नेतृत्वाखालील ‘काश्मिरी अमेरिकन कौन्सिल’द्वारे आयोजित परिषदांना संबोधित करण्यासाठी तीन वेळा अमेरिकेत जाऊन आले होते. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने सांगितले की, नवलखा हे अमेरिकेतील काश्मिरी फुटीरतावादी नबी फई यांच्याशी ई मेल आणि अधूनमधून भ्रमणभाष यांच्या माध्यमातून संपर्कात होते. या माहितीमुळे त्यांचा जामीन अर्ज स्वीकारण्यात येऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
नवलखा यांना ऑगस्ट २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एप्रिल २०२० मध्ये त्यांना नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची १ मासाच्या नजरकैदेची याचिका मान्य केली.