रशिया इस्लामिक स्टेटपेक्षा अधिक धोकादायक ! – युक्रेन

युक्रेनच्या सैनिकाचा रशियाच्या सैनिकाकडून शिरच्छेद करण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित

युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा

कीव (युक्रेन) – सामाजिक माध्यमांतून रशियाचा एक सैनिक युक्रेनच्या एका सैनिकाचा शिरच्छेद करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्वीट करत म्हटले, ‘रशिया जो आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटपेक्षा वाईट आहे, तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे, हे किती विचित्र आहे.  रशियाच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतून बाहेर काढले पाहिजे. युक्रेनमध्ये झालेल्या गुन्ह्यांसाठी उत्तरदायी धरले पाहिजे.’

१. या घटनेविषयी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनीही ट्वीट करून म्हटले की, जग रशियाच्या कारवाईकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही हे सर्व विसरणार नाही. या गुन्ह्यांसाठी आम्ही रशियाला कधीही क्षमा करणार नाही. या घटनेचे दायित्व रशियाला घ्यावे लागेल. या आतंकवादाचा पराभव आवश्यक आहे.

२. या घटनेविषयी युरोपियन युनियनच्या प्रवक्त्या नबिला मसराली म्हणाल्या की, आमच्याकडे या प्रकरणाची फारशी माहिती नाही; पण जर ते खरे असेल, तर ते रशियाच्या अमानवी वर्तनाचे आणखी एक उदाहरण असेल.