श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेची वर्ष २०२३ अखेरपर्यंतची नोंदणी पूर्ण !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या डिसेंबर २०२३ अखेरपर्यंतच्या नित्यपूजेची सर्व दिवसांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला ९४ लाख रुपये उत्पन्न मिळाले असल्याची, तसेच प्रतिदिन होणार्‍या तुळशी अर्चन पूजेलाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रतिदिन पहाटे नित्यपूजा केली जाते. नोंदणी करून ठरलेल्या दिनांकाला संबंधित भाविक आणि त्यांचे १० ते १२ कुटुंबीय यांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश दिला जातो. नित्यपूजा चालू असतांना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना मिळते. रुक्मिणीमातेस हळद, कुंकू लावून, देवाला पेढ्यांचा नैवेद्य आणि फळांचा महाप्रसाद पूजा करणार्‍यांच्या हस्ते दाखवला जातो.