हिंजवडी येथील ‘महापारेषण’ उपकेंद्र ७ वर्षे धूळ खात पडून !

‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांची चौकशीची मागणी

हिंजवडी येथील ‘महापारेषण’ उपकेंद्र ७ वर्षे धूळ खात पडून

पुणे – ‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंजवडीतील आस्थापनांना अखंडित वीजपुरवठा करण्याकरता ‘महापारेषण’ने ८९ कोटी रुपये व्यय करून ४०० केव्ही (किलो व्होल्ट) उपकेंद्र उभारले आहे; मात्र हे उपकेंद्र गेल्या ७ वर्षांपासून धूळखात पडून आहे. हे वास्तव ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुढे आणले आहे. त्यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली आहे. ‘या उपकेंद्रासह राज्यातील किती उपकेंद्रे धूळखात पडून आहेत ? याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी’, अशी मागणी वेलणकर यांनी ऊर्जा विभागाकडे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

वेलणकर म्हणाले की, हे उपकेंद्र विनावापर असल्याचे कारण म्हणजे, ४०० केव्ही क्षमतेच्या वाहिन्याच टाकलेल्या नाहीत. या क्षमतेच्या वाहिन्या टाकणे, त्याकरता मोठे टॉवर्स उभारणे, हे काम प्रचंड वेळखाऊ असल्याने पुढील काही वर्षे हे उपकेंद्र वापरात येण्याची शक्यता पुष्कळच अल्प आहे. ‘महापारेषण’चे अधीक्ष­क अभियंता प्रकाश कुरसंगे म्हणाले की, या उपकेंद्राचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. वीजपुरवठा करण्याकरता वाहिनी टाकण्याचे का­­­­­म एका आस्थापनाला दिले होते; परंतु काही अडचणींमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. आता नवीन ठेकेदाराला हे काम देण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच हे केंद्र चालू करण्यात येईल. या उपकेंद्रामध्ये १६७ एम्.व्ही.ए. (मेगा व्होल्ट अ‍ॅम्पियर) क्षमतेचे ३ पॉवर ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) मे २०१६ मध्ये बसवले आहेत. त्यापैकी २ पॉवर ट्रान्सफॉर्मर जेजुरी आणि कळवा उपकेंद्रांत हालवणार असून सध्या या प्रकल्पामध्ये कोणताही ‘पॉवर ट्रान्सफॉर्मर’ कार्यान्वित नाही.