सातारा, १२ एप्रिल (वार्ता.) – खिंडवाडी गावचे आराध्यदैवत श्रीजानाई-मळाईदेवीच्या डोंगरावर अचानक वणवा लागला होता. तब्बल ५ घंट्यांच्या अथक परिश्रमानंतर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना हा वणवा विझवण्यात यश मिळाले.
शहरापासून ८ ते १० किलोमीटर अंतरावर असणार्या खिंडवाडी या उपनगराला लागून श्रीजानाई-मळाईदेवीचा डोंगर आहे. मोठ्या प्रमाणात वनराईने नटलेला हा प्रदेश असल्याने मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर या डोंगरावर आहे. ४ दिवसांपूर्वी अचानक डोंगरावरील काही भागात वणवा लागला. हा वणवा ऐवढा भीषण होता की, भूमीवर उभे राहून त्याच्या ज्वाला स्पष्ट दिसत होत्या. विश्व हिंदु परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा उर्मिलाताई पवार यांना हा वणवा दिसताच त्यांनी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना वणवा विझवण्यास येण्यासाठी आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाध्यक्ष विजय गाडवे यांच्यासह बजरंग दल प्रखंड प्रमुख रोहित शिंदे, विश्व हिंदु परिषदेचे कोडोली अध्यक्ष शहाजी (आण्णा) कदम आणि ८-१० कार्यकर्ते सहभागी झाले. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांसह श्रीजानाई-मळाई डोंगराच्या पायथ्याशी असणार्या ‘वेदांत करिअर अकॅडमी’ मधील २० हून अधिक युवक आग विझवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले.
विश्व हिंदु परिषदेच्या कार्याचे कौतुक !
खिंडवाडी येथील अनेक नागरिक सकाळ-संध्याकाळी डोंगरावर फिरायला येतात. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांची निसर्गाप्रति आत्मियता पाहून त्यांना आनंद झाला. नागरिकांनी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देत त्यांनी केलेल्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले, तसेच वणव्यामुळे प्रभावित होणारी वृक्षवल्ली, अनेक वन्यजीव या सर्वांना वाचवू शकल्याचे समाधान मिळाले, असे विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय गाडवे यांनी सांगितले.