गेल्या ६ मासांपासून दीड कोटी रुपयांचा निधी प्रलंबित !

  • दिव्यांग निधी न मिळाल्यास तीव्र आंदोलन !

  • शिवसेना अपंग साहाय्य सेनेचे निवेदन

उपायुक्त रवीकांत अडसूळ यांना निवेदन देतांना अपंग साहाय्य सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – गेल्या सहा मासांपासून अपंगांना मिळणारा निधी मिळालेला नाही. ७० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्यांना दीड सहस्र रुपये, तर त्याखालील अपंगत्व असणार्‍या दिव्यांगांना १ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. २ सहस्र २०० दिव्यांगांना दीड कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाकडून मिळालेला नाही. हा निधी न मिळाल्याने दिव्यांगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयी महापालिका प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तरी हा निधी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी ‘शिवसेना अपंग साहाय्य सेने’च्या वतीने देण्यात आली. या मागणीचे निवेदन १२ एप्रिलला कोल्हापूर महापालिका उपायुक्त रवीकांत अडसूळ यांना देण्यात आले.

या प्रसंगी शहरप्रमुख अनिल मिरजे, कमलाकर भोसले, सागर गुरव, मारुति तळेकर, किरण काळे यांसह अन्य उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यावर हा निधी लवकरच खात्यावर जमा होईल, असे आश्वासन उपायुक्त रवीकांत अडसूळ यांनी दिले.