संबंधित प्रशासकीय यंत्रणांना आंबा हानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात येतील ! –  रत्नागिरी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

आंब्याच्या हानीविषयी सर्वेक्षण करण्याची आंबा बागायतदारांची मागणी

रत्नागिरी – अवेळी पडलेला पाऊस, कडक उन्हाळा आणि ढगाळ वातावरण यांमुळे येथील आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. वातावरणातील या पालटामुळे  यावर्षी आंब्याच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे आंबा बागायतींचे कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्याकडून सर्वेक्षण करावे, अशी मागणी येथील आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्याकडे  केली आहे. त्याला जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी ‘संबंधित यंत्रणांना आंबा हानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात येतील’, असे आश्वासन दिले. या वेळी सर्वश्री सुनील नावले, प्रकाश साळवी, पेडणेकर आणि अन्य आंबा बागायतदार उपस्थित होते.


यावर्षी जिल्ह्यात आंबापिकाला हवामानात होणार्‍या मोठा पालटाचा फटका बसला आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबरपासून चालू होतो. यावर्षी प्रारंभीपासूनच पिकाला अनुकूल वातावरण नाही. अशा वातावरणामुळे आंब्यावर ‘तुडतुडा’ मोठ्या प्रमाणात आहे. डिसेंबरमध्ये थंडीऐवजी उष्ण हवामान राहिल्यामुळे झाडांना मोहोराऐवजी पालवी फुटली. जानेवारी २०२३ मध्ये झाडांना मोहोर आला; पण खराब वातावरणामुळे अपेक्षेप्रमाणे फलधारणा झाली नाही. पीक वाचवण्यासाठी महागड्या औषधाच्या फवारण्या बागायतदारांना कराव्या लागल्या आहेत. त्याचाही उपयोग झालेला नाही. शेवटच्या टप्प्यातील मोहोर करपून वाया गेला. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात आंब्याचे पीक अंदाजे २० ते २५ टक्केच हाती येईल, असा अंदाज आहे.

आतापर्यंतची स्थिती विचित्र आहे. अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने बागायतदारांचा खर्च निघेल की नाही, अशी चिंता लागून राहिली आहे. या विदारक परिस्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आंबापिकाचे सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठवावा, अशी विनंती आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी केली.