भारताने चीनशी असलेले सर्व व्यवहार बंद करायला हवेत !

चीनने अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे पालटल्याचे प्रकरण

‘चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने २ एप्रिल या दिवशी अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नवीन नावे घोषित केली. चीन अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत आहे. २ भूभाग, २ निवासी क्षेत्रे, ५ पर्वत शिखरे आणि २ नद्या यांसह एकूण ११ ठिकाणांची नावे चीनने घोषित केली. चीनचे अधिकृत वृत्तमाध्यम ‘ग्लोबल टाइम्स’ने ३ एप्रिल या दिवशी यासंबंधीची माहिती दिली. चीनच्या नागरी मंत्रालयाने स्वतःच्या नोंदीमध्ये अरुणाचल प्रदेशचे नाव पालटण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये ६ आणि वर्ष २०२१ मध्ये १५ ठिकाणांची नावे चीनने घोषित केली होती.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

१. चीनने अरुणाचल प्रदेशमधील नावे पालटण्यामागील कारण !

चीनने असे करण्याची २ कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे चीनला सीमाभागावरील विषय धगधगता ठेवायचा आहे आणि दुसरे म्हणजे येत्या काळात चीन आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन सांगू शकतो की, अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांना चिनी नावे असल्याने ती ठिकाणे त्यांची आहेत. तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांच्या भेटीनंतर ही नावे पालटण्यात आली. वर्ष २०१७ मध्ये दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौर्‍यावर गेले होते. चीनने त्यांच्या दौर्‍यावर टीका केली आणि काही दिवसांनी पहिल्यांदाच नाव पालटले. गेल्या काही वर्षांपासून चीन आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. वर्ष २०१७ मध्ये डोकलाम संघर्षावरून भारत आणि चीन यांच्या लष्करामध्ये वाद निर्माण झाला होता. याखेरीज भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापाराविषयी तणाव निर्माण झाला आहे. गेल्या वर्षांत भारताने अनेक चिनी ‘ॲप्स’वर बंदी घातली आहे.

२. चीनच्या कृतीवर भारताने दिलेले सडेतोड प्रत्युत्तर  !

चीनच्या ‘शांघाय कॉर्पोरेशन’च्या २ बैठका भारतात होणार आहेत. चीनचे संरक्षणमंत्री एप्रिल मासात आणि मे मासात परराष्ट्रमंत्री भारतात येतील. त्याआधी कुरघोडी म्हणून चीनने ही नावे पालटण्याचे कृत्य केले आहे. चीनला सातत्याने भारतावर वर्चस्व गाजवणे आणि ‘आम्ही म्हणू ते योग्य’, ही भूमिका थोपवायची आहे; मात्र यापूर्वीपासून भारताकडून चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. याआधीही भारताने चीनचे असे पाऊल फेटाळून लावले होते. ‘अरुणाचल प्रदेश नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. नाव पालटून ही वस्तूस्थिती पालटणार नाही’, असेही भारताने यापूर्वी म्हटले होते.

३. चीनला मुत्सद्देगिरीने नव्हे, ‘जशास तसे’ उत्तर द्यायला हवे !

चीनला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची गोड भाषा समजत नाही. त्यांना ‘जशास तसे’ उत्तर द्यायला हवे. चीन ज्या देशांना त्रास देत आहे, त्या सर्व देशांना एकत्र करून भारताने एक संयुक्त आघाडी उभारायला पाहिजे. असे केल्यानंतर येत्या काळात जगातील सर्व देश चीनच्या उद्दामपणाच्या विरोधात उभे रहातील. भारताने चीनशी असलेले सर्व व्यवहार बंद करायला हवेत.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे