उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ४१ सहस्र ६६६ रुपयांची तरतूद !
मुंबई, ७ एप्रिल (वार्ता.) – मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानात खानपानासाठी एका वर्षासाठी साडेतीन कोटी रुपये, तर उपमुख्यमंत्र्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानात खानपानासाठी एका वर्षासाठी दीड कोटी रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या तरतुदीला सरकारकडून मान्यता देण्यात आली. यानुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एका दिवसाच्या खानपानासाठी सरासरी ९७ सहस्र २२२ रुपयांची, तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एका दिवसाच्या खानपानासाठी सरासरी ४१ सहस्र ६६६ रुपयांची ही तरतूद आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थावरील खानपानाचा ४ मासांचा व्यय २ कोटी ३८ लाख रुपये एवढा झाल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थानी होणार्या महत्त्वाच्या बैठका आणि त्यांतून राज्यात होत असलेली गुंतवणूक समजून घेण्याचे आवाहन केले होते. या प्रकारानंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानांच्या खानपान सेवेसाठी निविदाप्रक्रिया राबवून खासगी अस्थापनाला याचा ठेका दिला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी खानपानासाठी स्वतंत्र आस्थापनांची नियुक्ती करण्यात आली आहे. १० एप्रिल २०२३ पासून ते ९ एप्रिल २०२५ पर्यंत हा ठेका देण्यात आला आहे.
एक कप चहा १८ रुपयांना : एकूण ७३ पदार्थांना मान्यता !
यामध्ये एका चहासाठी सरकारला १८ रुपये, तर कॉफीसाठी १३ रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये एकूण न्याहारी, पेय, तसेच दुपार आणि रात्रीचे भोजन या सर्वांसाठी एकूण ७३ पदार्थ निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ‘स्पेशल व्हेज अॅन्ड नॉनव्हेज बुफेट डिनर’साठी सर्वाधिक ३५० रुपये मोजावे लागणार आहेत.