प.प. श्रीधरस्वामी यांच्याकडून ‘गीतरामायणा’विषयी घडलेला दैवी साक्षात्कार !

आज ८ एप्रिल २०२३ या दिवशी प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांची पुण्यतिथी !

प.प. भगवान श्रीधरस्वामी

कोटी कोटी प्रणाम !

‘आपल्या हातून प्रभु रामचंद्रांच्या जीवनावर आधारित ‘गीतरामायण’सारखी अजरामर कलाकृती अर्थात् गीतातून सांगितली जाणारी रामकथा लिहून होईल’, असे ग.दि. माडगूळकरांना स्वप्नातही वाटत नव्हते; मात्र पुणे आकाशवाणीवर कार्यरत असलेले सीताकांत लाड हे ग.दि. माडगूळकरांना एकदा सहज बोलता बोलता म्हणाले, ‘‘या आकाशवाणी केंद्रावरून आपण बहुधा तेच तेच कार्यक्रम सादर करतो; मात्र माझ्या मनात असे आले आहे की, आकाशवाणीवरून आपण एखादी मोठी अशी संगीतिका करावी की, जी रेडिओ ऐकणार्‍यांच्या काळजात चिरंतन स्मृती म्हणून रहावी. आपण गीतकार आहात, कवीराज आहात, तेव्हा पहा एखादा नवीन विषय सुचतो का ?’’

प.प. श्रीधरस्वामी यांनी ग.दि. माडगूळकरांच्या जिभेवर ॐ काढून अलौकिक कामगिरीसाठी आशीर्वाद देणे

ग.दि. माडगूळकरांनी तो विषय तेथेच झटकून लावला. त्याचा त्यांनी लगेच विचार असा केलाच नाही. असेच काही दिवस गेले आणि माडगूळकरांच्या कानावर आले की, प.प. श्रीधरस्वामी हे समर्थ रामदासस्वामी यांच्या सज्जनगडावर आलेले आहेत. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक; पण आपल्या समवेतच्या स्नेह्यासह त्यांनी सज्जनगडला जाण्यासाठी परळी गावाशेजारच्या किमान ७५० पायर्‍या चढायला प्रारंभ केला. त्या वेळी आताप्रमाणे गडावर गाडी वा एस्.टी. जात नव्हती.

गडावर गेल्यानंतर त्यांनी समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांवर डोके टेकले. त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी प.प. श्रीधरस्वामी जिथे वास्तव्याला होते तिकडे मोर्चा वळवला. समोर प.प. श्रीधरस्वामी दिसताच ग.दि. माडगूळकरांनी त्यांच्या पायावर डोके टेकवून साष्टांग नमस्कार घातला. प.प. श्रीधरस्वामी यांनी माडगूळकरांना आशीर्वाद दिला. ग.दि. माडगूळकर उठून बसले नि एकटक स्वामींच्या पायावर नजर ठेवून राहिले. डोळे मिटलेले. असाच काही वेळ गेला नि प.प. श्रीधरस्वामी माडगूळकरांना म्हणाले, ‘‘माडगूळकर जरा जवळ या.’’ ग.दि. माडगूळकर भारावल्या स्थितीत जवळ गेले. ‘‘जीभ बाहेर काढा’’, असा आदेश स्वामींनी दिला. ग.दि. माडगूळकरांनी आज्ञेचे तंतोतंत पालन केले. प.प. श्रीधरस्वामी यांनी जवळचीच एक छोटीशी लेखणी घेतली नि तिने गदिमांच्या जिभेवर ‘ॐ’ काढला. ‘माडगूळकर तुमच्या हातून एक अलौकिक कामगिरी होणार आहे. तुमच्या नावाचा डंका आतापासून पुढे पिढ्यानपिढ्या वाजत रहाणार आहे. जा कामाला लागा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.’’

प.प. श्रीधरस्वामी यांच्या आशीर्वादाने ग.दि. माडगूळकरांना ‘गीतरामायणा’चे शब्द स्फुरून ते अजरामर होणे

प.प. श्रीधरस्वामी यांनी ग.दि. माडगूळकरांच्या जिभेवर जो ‘ॐ’ काढला होता, तो केवळ ॐ नव्हता, तर प्रत्यक्ष माता सरस्वती आणि बुद्धीदेवता श्रीगणेशाचे वास्तव्य तिथे झाले होते आणि अशातच त्यांना शब्द स्फुरले ते ‘गीतरामायणा’च्या १ ते ५६ गीतांचे ! ज्याला आशीर्वाद लाभला प्रत्यक्ष प्रभु रामचंद्र, प.प. श्रीधरस्वामी, सज्जनगड निवासी रामभक्त समर्थ रामदासस्वामी, माता सरस्वतीदेवी, श्रीगणेश यांचा आणि ज्याला सुरेल आवाज अन् संगीत लाभले बाबूजी तथा सुधीर फडके यांचे ! याला रसिकांसह भल्याभल्यांचे आशीर्वाद आणि भरभरून कौतुक लाभले.’

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, १ मार्च २०२३)