मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर निर्णय लवकरच ! – केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल

पिंपरी (पुणे) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सांस्कृतिक विभाग सकारात्मक आहे. मराठी भाषेला गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य आणि वस्तू पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत. मराठी भाषा जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि सर्वसामान्य माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या विनंतीचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिले आहे, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.