आपण म्हणत असतो की, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे खास असे वेगळेपण असते. प्रत्येक व्यक्ती ही इतरांसारखी नसते. प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असतात. आता हे जे वेगळेपण आहे ते म्हणजे आपल्या शरिराचा स्वभाव धर्म. प्रकृतीचे अनेक वर्गीकरण होऊ शकतात जसे की,
१. शरिरातील दोषानुसार त्याची प्रकृती
२. शरिरात असलेल्या पंचमहाभूतानुसार प्रकृती
३. सत्त्व, रज आणि तम या गुणांनुसार प्रकृती
असे अनेक वर्गीकरण होऊ शकतात. आज आपण फक्त दोषानुसार प्रकृती याचे प्रकार कसे आहेत ? ते बघणार आहोत.
१. स्वतःची प्रकृती समजण्यामागील कारण
स्वतःचे आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने आपली प्रकृती समजणे महत्त्वाचे असते. आपली प्रकृती समजणे म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली मिळण्यासारखे आहे; कारण आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार कसा आहार घ्यायला पाहिजे ? कोणता आहार टाळायला हवा ? कोणते आजार होण्याची शक्यता आहे ? आजार टाळण्यासाठी आपण काय करू शकतो ? अशा सगळ्या गोष्टींचे मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तसेच एखादा आजार झालाच, तर तो दूर करण्यासाठी प्रकृतीचा अभ्यास पुष्कळ महत्त्वाचा ठरतो. उदा. एखादा पित्त प्रकृतीचा माणूस आहे, तर अशा व्यक्तीला औषध देतांना ते फार उष्ण असे देऊन चालणार नाही; कारण त्याला त्याचा लाभ होण्याऐवजी अधिक त्रास होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील; पण व्याधी दूर करणे, हा पूर्णपणे वैद्यांचा भाग आहे. असे असले, तरी आपल्याला रोग होऊच नये; म्हणून प्रकृती समजून घ्यायची आहे.
२. व्यक्तीची प्रकृती कशी सिद्ध होते ?
आता आपण प्रकृती कशी सिद्ध होते ? ते जाणून घेणे आवश्यक आहे. जेव्हा आईच्या गर्भाशयात जीव निर्माण होतो, तेव्हा जो दोष प्रबळ (dominant) असतो, त्यानुसार त्या व्यक्तीची प्रकृती ठरते. नवीन जीवाची प्रकृती ही खालील गोष्टींवर अवलंबून असते –
२ अ. आई किंवा बाबा यांच्या बीजामध्ये नेमके कोणते दोष अधिक होते ?
२ आ. गर्भधारणेच्या वेळी आईने कसा आहार घेतला होता ? किंवा दिनक्रम कसा पाळला होता ?
२ इ. गर्भाशयाची स्थिती
२ ई. गर्भधारणा कोणत्या काळामध्ये झाली, म्हणजे सकाळी, दुपारी कि रात्री ? या सगळ्या गोष्टी प्रकृती ठरवण्यात कारणीभूत ठरत असतात.
आता जेव्हा जीव सिद्ध होतो, तेव्हा प्रत्येक जीवाला दोन पाय, दोन हात असे सगळे अवयव सिद्ध होतात. प्रत्येक व्यक्तीत पचनक्रिया, श्वसन, रक्ताभिसरण हे सर्व होतच असते. मग प्रकृतीचा भेद कुठे लक्षात येतो, तर कुणामध्ये अन्नपचनाची क्रिया पुष्कळ पटकन किंवा उशिरा होते; कुणी दिसायला कृश, तर कुणी गुटगुटीत; कुणाचे केस सरळ, तर कुणाचे कुरळे, असा भेद आपल्याला व्यक्तीपरत्वे दिसून येतो. हा वैशिष्ट्यपूर्ण भेद म्हणजे त्या व्यक्तीची प्रकृती असते.
आता सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली प्रकृती पालटत असते का ? तर याचे उत्तर आहे की, प्रकृती कधीच पालटत नसते. जन्मापासून एखाद्या व्यक्तीची जर वात प्रकृती असेल, तर मरेपर्यंत त्या व्यक्तीची वात प्रकृतीच राहते. त्याची कधी पित्त वा कफ प्रकृती झाली, असे होत नाही; पण अशा व्यक्तीमध्ये कफ किंवा पित्त दोष वाढू शकतो.
३. दोषानुसार प्रकृतीचे वर्गीकरण
आता दोषानुसार प्रकृतीचे वर्गीकरण कसे असते ? ते समजून घेऊया.
३ अ. एक दोष प्रकृती : वात, पित्त आणि कफ प्रकृती (एका दोषाची लक्षणे असणे).
३ आ. दोन दोषात्मक प्रकृती : वात – पित्त प्रकृती, पित्त – कफ प्रकृती, कफ – वात प्रकृती (दोन दोषांची लक्षणे असणे).
३ इ. तीन दोषात्मक प्रकृती : वात – पित्त – कफ प्रकृती (तीनही दोषांची लक्षणे असणे)
एक दोष प्रकृतींच्या प्रकारामध्ये वात प्रकृती ही हीन प्रकृती, तर पित्त प्रकृती मध्यम आणि कफ प्रकृती उत्तम असते. दोन दोषात्मक प्रकृतीमध्ये पित्त – कफ उत्तम, कफ – वात मध्यम आणि वात – पित्त ही हीन प्रकृती समजली जाते. येथे हीन प्रकृती म्हणजे या प्रकृतीच्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी अधिक निर्माण होतात आणि त्यांना झालेले विकार बरे होण्यासही वेळ लागतो; परंतु प्रकृती ओळखून नियमाने आचरण केल्यास प्रकृती हीन असूनही आरोग्य टिकवून ठेवता येऊ शकते.
४. आपली प्रकृती ही बाधाकर नसते !
जन्मतः जो दोष प्रबळ असतो, ती आपली प्रकृती असते. त्या प्रबळ दोषाचा आपल्याला कधी त्रास होत नसतो; पण आपण चुकीचा आहार विहार केला अन् दोषांचे प्रमाण बिघडले, तर मात्र आरोग्यास बाधा निर्माण होते. उदा. एखाद्या वात प्रकृतीच्या माणसाने थोडे जरी वात वाढवणारे पदार्थ खाल्ले, तरी त्याच्या शरिरातील वात पटकन वाढेल. याउलट कफ प्रकृतीच्या व्यक्तीने वातूळ पदार्थ खाल्ले, तर त्याला तेवढ्या लवकर वाताचा त्रास होणार नाही. आईस्क्रीम खाल्ल्यावर काहींना लगेच कफाचा त्रास होतो, तर काहींना त्रास होत नाही ते त्यांच्या प्रकृतीमुळे !
५. शरिरात दोषानुसार आढळणारी लक्षणे
आता कोणत्या दोषानुसार कोणती लक्षणे आपल्या शरिरात आहेत, ते जाणणे आवश्यक आहे.
५ अ. वात प्रकृती
१. शरीरयष्टी : वात प्रकृतीची व्यक्तीची शरीरयष्टी बारीक आणि वजन अल्प असते.
२. त्वचा : त्वचा रुक्ष आणि निस्तेज असते. या प्रकृतीच्या व्यक्तींना पायाला नेहमी भेगा पडतात.
३. केस : कुरळे, कोरडे, भुरके असतात. केसांची टोके नेहमी दुभंगतात.
४. दात : वेडेवाकडे आणि लवकर किडणारे
५. हाडे : सांध्यांची हालचाल करतांना कट कट आवाज येतो.
६. स्वभाव : वातप्रकृतीच्या व्यक्ती बोलक्या असतात. त्यांना झोप अल्प लागते आणि लगेच जाग येते. झोपेत सतत स्वप्न पडतात. या व्यक्ती स्वभावाने चंचल असतात. एका जागी स्थिर बसू शकत नाहीत. या व्यक्तींना मलावष्टंबाचा (बद्धकोष्ठतेचा) त्रास वारंवार होत असतो. घाम अल्प प्रमाणात येतो. या व्यक्तींची आकलन क्षमता चांगली असते; परंतु दीर्घकाळ लक्षात मात्र रहात नाही. या व्यक्तींची प्रतिकारक्षमता अल्प असते.
५ आ. पित्त प्रकृती
१. शरीरयष्टी : या व्यक्ती मध्यम उंचीच्या असतात आणि फार स्थूल वा बारीकही नसतात.
२. त्वचा : या प्रकृतीच्या व्यक्तीची त्वचा गौरवर्णाची असते. त्वचा आणि चेहरा यांवर पुष्कळ तीळ असतात.
३. केस : केस पातळ पिंगट असतात. या व्यक्तींचे केस लवकर पांढरे होतात आणि अकाली गळतातही.
४. दात : दातांचा रंग थोडा पिंगट असतो.
५. इतर : या प्रगतीच्या व्यक्तींना घाम पुष्कळ येतो आणि भूकही पुष्कळ लागते. पित्त प्रकृतीची व्यक्ती भूक सहन करू शकत नाही. भुकेची वेळ चुकल्यास डोके दुखणे, चक्कर येणे असे होते. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना थंड वातावरणात रहायला आवडते. यांना मलावष्टंबाचा त्रास होत नाही. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती धाडसी आणि पुढाकार घेणार्या असतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती रागीट असतात.
५ इ. कफ प्रकृती
१. शरीरयष्टी : या प्रकृतीच्या व्यक्तींचा बांधा मजबूत असतो. या व्यक्ती उंच आणि दणकट असतात.
२. त्वचा : अतिशय तुकतुकीत आणि सुंदर असते. त्वचेवर तीळ किंवा डाग नसतात. या व्यक्तींना लवकर सुरकुत्या पडत नाहीत.
३. केस : काळेशार आणि घनदाट असतात. केस मऊ आणि चमकदारही असतात.
४. दात : मोठे, सरळ आणि दातांमध्ये फटी नसलेले असतात.
५. हाडे : या व्यक्तींचे सांधे बळकट असतात. हालचालींच्या वेळी सांध्यांमधून आवाज येत नाही.
६. स्वभाव : या व्यक्तींना भूक सहन होते. या व्यक्तींची मलप्रवृत्ती नियमित असते. या व्यक्तींना गाढ झोप लागते, तसेच या व्यक्ती स्वभावाने शांत आणि स्थिर असतात. मानसिक आजार नसतो. या व्यक्तींच्या कृती संथ; पण व्यवस्थित होत असतात. कफ प्रकृतीच्या व्यक्ती मितभाषी असतात.
६. स्वतःची प्रकृती कशी ओळखायची ?
स्वतःचे शरीर, अवयव, स्वभाव यांची सूची करायची आणि ते कसे आहेत, म्हणजे वात, पित्त कि कफ ? यांनुसार आहेत, याचा अभ्यास करायचा. ज्या दोषाला अधिक गुण मिळतील ती आपली प्रकृती. शक्यतोवर आपल्याला दोन दोषात्मक प्रकृती सगळीकडे आढळते. ज्या दोषांची लक्षणे सर्वाधिक त्या दोषाला पहिला क्रमांक द्यावा. त्यानंतर इतर दोन दोषांपैकी ज्या दोषाची लक्षणे अधिक त्याला दुसरा क्रमांक द्यावा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या शरिरात वाताची लक्षणे अधिक आणि त्यानंतर पित्ताची लक्षणे अधिक असतील, तर त्याची प्रकृती वात – पित्त प्रकृती असते. जर व्यक्तीमध्ये पहिल्या क्रमांकावर पित्ताची लक्षणे असतील आणि नंतर वाताची असेल, तर त्या व्यक्तीची प्रकृती पित्त – वात अशी असते.
याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानुसार स्वतःचे खाणे-पिणे ठेवल्यास आपण आरोग्य चांगले ठेवू शकतो. आपल्याला स्वतःला प्रकृती ओळखण्यात अडचण असेल, तर जवळच्या वैद्यांकडून स्वतःची प्रकृती समजून घ्यावी आणि त्यानुसार आचरण करावे. स्वतःचे आरोग्य स्वतःच्याच हातात आहे आणि ते राखण्यासाठी गांभीर्याने प्रयत्नही करणे आवश्यक आहे.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे