पाकिस्तान सरकार हे पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इंसाफ (पीटीआय) या पक्षाला आतंकवादी गट म्हणून घोषित करण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे पाकमध्ये अक्षरशः गृहयुद्ध चालू आहे. पाक सरकार आणि त्याचे मुख्य शाहबाज शरीफ यांना असे वाटते की, इम्रान खान यांच्या विरोधात खटला प्रविष्ट करावा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या साहाय्याने पाकला आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी तेथील सरकार प्रयत्नरत आहे. असे असतांना इम्रान खान याविरोधात असून कोणतेही आर्थिक साहाय्य घेण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये निवडणूक व्हावी, असे त्यांचे म्हणणे आहे. इम्रान खान यांना अटक करण्याचा वेगवेगळ्या कारणांनी प्रयत्न करण्यात आला; परंतु ते प्रत्येक वेळी पळून जाण्यात यशस्वी झाले. इम्रान खान पाकच्या जनतेत अतिशय प्रसिद्ध असल्याने त्यांना अटक झाल्यास तेथील हिंसाचार वाढू शकतो. एकंदरीतच पाकिस्तानचे राजकीय पक्ष एकत्र येऊन देशासाठी उभे रहाण्याऐवजी सत्ता मिळवण्यासाठी शक्य असेल ते करतांना दिसत आहेत. येणारा काळ पाकिस्तानसाठी अतिशय बिकट असणार आहे.
१. पाकिस्तानची अवस्था बॉटमलेस पिटसारखी (न संपणार्या खड्ड्यासारखी) !
पाकिस्तानमधील नागरिकांना प्रतिदिन जेवणाचीही सोय होत नाही. महागाई टोकाला गेली आहे. पाकिस्तानची जनता महागाईमध्ये भरडली जात आहे. पेट्रोल-डिझेल, भाज्या, जीवनावश्यक वस्तू यांचे मूल्य इतके वाढले आहे की, सामान्य नागरिकांना जीवन जगणेही कठीण झाले आहे. या सर्वांतून वाचण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणे अत्यावश्यक झाले आहे. पाकची अवस्था बॉटमलेस पिटसारखी झाली असल्याने त्याला सध्या कोणताही देश आणि चीनही कर्ज देण्यासाठी सिद्ध नाही.
२. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पाकमधील कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास नसणे
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितले आहे की, आर्थिक साहाय्याचा करार करण्यासाठी पाकिस्तानच्या सर्व राजकीय पक्षांकडून कर्ज परतफेड होण्याची हमी हवी आहे. याचा अर्थ असा की, सध्या सरकारमध्ये असलेल्या पक्षावर या संघटनेचा विश्वास नाही. सर्व राजकीय, राष्ट्रीय पक्षांपैकी जो कोणता राजकीय पक्ष सरकारमध्ये असेल, त्याने हे कर्ज परतफेड करावे, असे संघटनेचे म्हणणे आहे. कर्ज देतांना सर्वानुमते अटींचे पालन व्हायला हवे आहे. यासाठी इम्रान खान मात्र सिद्ध नाहीत. उलट त्यांनीच पाकिस्तान सरकारला चेतावणी दिली आहे की, जोपर्यंत पाकमध्ये निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत त्यांची सरकार विरोधातील निदर्शने चालू रहातील.
३. पाकिस्तानी सैन्याचीही दैन्यावस्था
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. सातत्याने भारतात आतंकवादी कारवाया, अमली पदार्थांची विक्री अशा कारवायांमध्ये गुंतलेली आहे. तिकडे अफगाणिस्तानमधील आतंकवादी संघटना तेहरीक ए तालिबान पाकिस्तान ही सातत्याने पाकमध्ये आतंकवादी कारवाया करत आहे. पाकिस्तानचे सैन्य या कारवाया रोखण्यात अपयशी ठरलेले दिसत आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.