डागाळलेले नेतृत्व !

राहुल गांधी

काँग्रेससाठी सर्वेसर्वा असणारे राहुल गांधी यांना २३ मार्चला २ वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका सार्वजनिक सभेत त्यांनी सर्व चोरांची नावे मोदी कशी काय ?, असा प्रश्‍न उपस्थित करून स्वतःचीच बौद्धिक दिवाळखोरी दर्शवली होती. यावर सुरत येथील मोदी समाजाने तीव्र आक्षेप घेत त्यांच्यावर खटला प्रविष्ट केला होता. या प्रकरणात त्यांना जामीन संमत झाला, हे वेगळे ! पण राहुल गांधी यांना शिक्षा तरी ठोठावण्यात आली, हेही नसे थोडके ! काँग्रेसींनी या प्रकरणी अनेक आरोप करून या शिक्षेला विरोध केला; पण शिक्षा झाल्याने काँग्रेसच्या विरोधकांना या प्रकरणी पुष्कळ समाधान मिळाले. अनेकांनी शिक्षा घोषित झाल्यावर आनंद व्यक्त केला. वाचाळ बडबडीला शिक्षा मिळाली, हे एका दृष्टीने बरेच झाले; पण त्या वाचाळ बडबडीमागे मोदीद्वेष हे कारण अधिक महत्त्वाचे होते. मोदी कसे चोर आहेत ? या वाक्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न होता. या प्रकरणाची सुनावणी चालू असतांना गांधी म्हणाले होते, मी काय बोललो होतो, ते मला आता आठवत नाही. बोलतांना जीभ कधी अडखळत नाही आणि नंतर मात्र साळसूदपणाचा आव आणत तो मी नव्हेच, अशी भूमिका घेणार्‍या राहुल गांधी यांना सगळे भारतीय ओळखून आहेत. त्यामुळे त्यांची गांधीगिरी आता अधिक काळ चालू दिली जाणार नाही. या प्रकरणी जरी त्यांना जामीन संमत केलेला असला, तरी शिक्षेमुळे गांधी यांच्या बेताल वक्तव्यांना काही प्रमाणात का होईना लगाम बसेल, असे वाटते. या प्रकरणात राहुल गांधी यांची खासदारकी रहित झाली आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे सांगितले, सत्य हाच माझा देव आहे. पुन्हा तेच…! वाटेल ती विधाने करत रहायची आणि सर्वांसमोर स्वत:चेच हसे करून घ्यायचे, याची जणू राहुल गांधी यांना सवय जडलेली दिसते. सत्य म्हणजे काय ?, सत्य हा देव कधी असतो ?, सत्य कोण बोलते ? हे राहुलबाबांना तरी ठाऊक आहे का ? काहीही बोलायचे आणि अशी विधाने जनतेच्या माथी लादू पहायची, ही रणनीती आता जनताच चालू देणार नाही, हे त्यांनी वेळीच लक्षात घ्यावे !

वाचाळविरांना वेसण हवे !

नुकतीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली आणि काँग्रेसला पुनर्जीवित करण्याचा (केविलवाणा) प्रयत्न केला. यातून अंशात्मक प्रमाणात त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाविषयी विश्‍वास निर्माणही केला असेल; पण पुन्हा काही काळाने ये रे माझ्या मागल्या ! अशीच त्यांची गत होत असते. यात्रा संपवून विदेशात गेल्यावर भारताच्या नावाने त्यांनी बोटे मोडली. भारत कसा दुःस्थितीत आहे, याचे त्यांनी विदेशींसमोर गार्‍हाणे मांडले. ज्या भारताला यात्रेद्वारे जोडण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न विदेशात जाऊन धुळीस मिळवला. अशाने त्यांच्या पदरी तरी काय पडले ? जगासमोर मोठेपणा मिरवत स्वत:चा एक चेहरा दाखवायचा आणि त्यामागील राष्ट्र अन् हिंदुद्वेषी चेहरा लपवून ठेवायचा, हाच त्यांचा डाव असतो. त्यामुळे तेल गेले, तूपही गेले आणि हाती राहिले धुपाटणे, अशी सध्या त्यांची गत झाली आहे. प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नांत ती नकळतपणे डागाळली जात आहे, याची त्यांना जाणीवच नाही. खरेतर विदेशात भारताची अपकीर्ती केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना भारतात पाऊलच ठेवू द्यायला नको होते.

मध्यंतरी योगी आदित्यनाथ हे धार्मिक नेते नाहीत, तर सामान्य गुंड आहेत, असे विधानही याच राहुलबाबांचे ! २ वर्षांपूर्वी ते वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यांनी तेथे सांगितले होते, माझे कुटुंब काश्मिरी पंडित असून मी माझ्या बांधवांना (काश्मिरी पंडितांना) साहाय्य करीन. मी जे काही बोलेन, ते खोटे नसेल. प्रत्यक्षात केले मात्र काहीच नाही. गांधी कुटुंबाची कुंडली संपूर्ण देशाला ठाऊक असतांना स्वतः काश्मिरी पंडित असल्याचे सांगणे याहून दुसरा विनोद कोणता ? विनाकारण चर्चा करून मोठेपणा दाखवण्यापेक्षा राहुल गांधी यांनी आतापर्यंत केलेली विधाने कृतीत आणली असती, तर सत्य जगासमोर उघड झालेच असते. विनाकारण सत्याची परिभाषा कथन करण्याची वेळच आली नसती. मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनीही राहुल गांधी यांना अधिक दायित्वाने बोला, असा मोलाचा उपदेश केला; पण कुणाचे ऐकले तर ते राहुल गांधी कसले ?

सत्य जाणा !

राहुल गांधी हे काँग्रेस पक्षासाठी उत्तरदायी आहेत. असे असतांना त्यांची भूमिका देशहितकारकच हवी. प्रत्येक घटनेच्या दृष्टीने वास्तवाचे भान जोपासायला हवे. महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी त्यांच्या वचनांशी बांधील रहाणे क्रमप्राप्त आहे. लोकशाहीच्या मर्यादा पाळायला हव्यात. असे नेतृत्वच इतिहास घडवू शकते, हे राहुल यांनी लक्षात घ्यावे. सातत्याने मोदीद्वेष दर्शवण्यापेक्षा काँग्रेसने भारतियांचे किती भले केले ? तेही पहावे. काँग्रेसने आतापर्यंत हिंदूंचे, पर्यायाने भारतियांचे भविष्य नष्ट केले आहे. राहुल यांनीही आजवर काही वेगळे केलेले नाही. आधीच दुर्दशा झालेल्या काँग्रेसला राहुल गांधी यांसारखे वीर (?) स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत विनाशाच्या खाईत लोटत आहेत. राहुल गांधी यांच्या बालीश विधानांवर अनेक लोक हसतात. त्यांचे वारंवार हसे होत असतांना या सत्याकडे ते कधी लक्ष देणार ? सत्ता जरी गेली असली, तरी मूळ राष्ट्रविघातक वृत्ती गेलेली नाही, हे खरे ! त्यांना त्यांच्या राष्ट्रविघातक भूमिकेसाठी शिक्षा मिळायलाच हवी; पण गुन्हा करायचा, शिक्षा होणार आणि जामीन मिळणार, हा स्वस्त अन् सहज पर्याय उपलब्ध होत असल्यानेच राहुल गांधी यांच्यासारख्यांचे फावते. मूठ तर सुटत चाललेलीच आहे. त्यामुळे हातात आणखी काय काय मावणार ? आतातरी देशाची वाटचाल विनाशाकडे होऊ न देता ती विकासाकडे होण्यासाठी प्रयत्न करावेत ! इतरांना कलंकित करू पहाण्यापेक्षा स्वतः किती डागाळले गेलो आहोत, हे पाहिल्यास राहुल गांधी यांना सत्य उमजेल, हे निश्‍चित !

राष्ट्रद्वेषी भूमिका घेणारे राहुल गांधी यांनी काँग्रेसने भारतियांचे किती भले केले ?, याची उत्तरे शोधून सत्य जाणावे !