दुधात भेसळ का ?

दुधातील भेसळ

श्रीगोंदा तालुक्‍यातील (जिल्‍हा नगर) काष्‍टी येथील दूध भेसळ प्रकरणातील मुख्‍य वितरक संदीप मखरे याला अटक केली आहे; परंतु या प्रकरणातील मुख्‍य आरोपी अजूनही पसार आहे. दूध भेसळीची व्‍याप्‍ती आता नगरसह पुणे आणि सोलापूर जिल्‍ह्यातही पसरली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर आल्‍यामुळे अनेक व्‍यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अनेक जण भीतीने पसार झाले आहेत. दूध भेसळ समस्‍या दिवसेंदिवस जटील आणि गंभीर बनत चालली आहे. त्‍यामुळे याचे पडसाद नुकतेच विधानसभेतही उमटले. यामध्‍ये ‘दुधात भेसळ करून सामान्‍य जनतेच्‍या जिवाशी खेळ करणार्‍यांना फाशी देण्‍याचे प्रावधान करावे,’ अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच विधानसभेत केली. त्‍यांच्‍या या मागणीवरूनच समस्‍येची भीषणता किती आहे, याचा अंदाज येतो.

दूध हे शरिरातील ऊर्जेची झीज भरून काढणारी प्रथिने, हाडांच्‍या वाढीस आवश्‍यक असणारी मूलद्रव्‍ये आणि निरोगी आरोग्‍य देणारी जीवनसत्त्वे, तसेच शरिरास आवश्यक असणारी ऊर्जा पुरवणारे स्निग्‍धांश अन् दूध शर्करा यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करते. यामुळे याचा वापर लहान मुले आणि वयस्‍कर यांच्‍यामध्‍ये अधिक प्रमाणात असतो. असे असले तरी दुधामध्‍ये सोडा, खाद्यतेल, युरिया, मीठ, निरमा पावडर, पाणी अशा अनेक प्रकारचे घटक घालून पैसे मिळवण्‍याच्‍या हेतूने मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. अशा दुधाचे सेवन केल्‍यानंतर शरिरावर काय परिणाम होत असेल ? हे वेगळे सांगायला नको. यामुळे लहान मुलांचे शरीर निरोगी होण्‍याऐवजी रोगी होत आहे. भेसळ केलेले दूध नैसर्गिक दूधासारखेच दिसत असल्‍यामुळे सर्वसामान्‍यांना भेसळ केलेले दूध ओळखता येत नाही.

जेव्‍हा भेसळ झाल्‍याचे एखादे प्रकरण सापडते, त्‍या वेळी त्‍यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते, विषयाचे गांभीर्य वाढले आहे, असे वाटते; परंतु पुन्‍हा काही नाही, अशी स्‍थिती असते. अशा प्रकारे स्‍वार्थासाठी सामान्‍यांना वेठीस धरणारे गुन्‍हे न्‍यून होण्‍यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्‍यकच आहेत, तसेच जनतेने स्‍वार्थाच्‍या आहारी जाऊन अयोग्‍य कृती करणे टाळण्‍यासाठी त्‍यांना धर्मशिक्षण देणेही अपरिहार्य आहे. यामुळे समाजाची सात्त्विकता वाढेल आणि गुन्‍हेगारी वृत्ती नष्‍ट होण्‍यास साहाय्‍य होईल. त्‍यामुळे विधानसभेत विषय चर्चिले जातील, शिक्षेचे प्रावधान होईलही; परंतु समस्‍या खर्‍या अर्थाने सुटण्‍यासाठी तिच्‍या मुळाशी जाणे आवश्‍यक आहे !

– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.