प्रदूषण रोखण्यासाठी जगातील उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करू !- दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई

मुंबईतील वायूप्रदूषण रोखण्याची सर्वपक्षीय आमदारांची मागणी !

दीपक केसरकर

मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – मुंबईमध्ये सर्वाधिक प्रदूषण धूलीकणांमुळे होत आहे. मुंबईकरांना शुद्ध हवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील मोठ्या शहरांत वापरण्यात येणारे, तसेच जगातील उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल, असे आश्वासन मुंबईचे पालकमंत्री यांनी विधान परिषदेत दिले.

भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुंबईतील वाढते वायूप्रदूषण रोखण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार ? याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला. आमदार सुनील राणे यांनी वाहने, कचरा जाळणे, स्मशानभूमीमधील अग्निसंस्कार, मोठ्या प्रमाणातील बांधकामे यांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. मुंबईतील दाट लोकवस्तीमध्ये महानगरपालिकेच्या अनुमतीविना मेट्रोसाठी सिमेंट सिद्ध करण्याचे काम चालू आहे. आजूबाजूच्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ याला अनुमती कशी देते ? याची चौकशी करण्याची मागणी केली. याविषयी चौकशी करण्याचे आश्वासन दीपक केसरकर यांनी सभागृहात दिले.

‘अग्निसंस्कार’ हा धार्मिक विधी असल्यामुळे विद्युतवाहिनीसाठी कुणावर सक्ती करता येणार नाही; परंतु मुंबईतील सर्व स्मशानभूमीत पार्थिवाच्या दहनासाठी नैसर्गिक वायू उपलब्ध करून देण्यात येईल. खासगी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मेट्रोचे काम चालू आहे. भारतीय प्रशासकीय अधिकारी संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत प्रदूषण रोखण्याविषयी उपाययोजना निश्चित करण्यासाठी ७ जणांची समिती स्थापन करण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.