कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने ‘एबीपी न्यूज’ हिंदी वृत्तवाहिनीला कारागृहातून दिलेल्या मुलाखतीत धमकी !
नवी देहली – प्रसिद्धीसाठी किंवा पैसे गोळा करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीमधील कुणाला मारायचे असेल, तर जुहू चौपाटीवर फिरणार्या कुणालाही मारले असते; मात्र तसे नाही. आम्ही इतर कुणालाही धमकी दिलेली नाही. सलमान खान याच्याविषयी आमचे काही वैचारिक मतभेद आहेत आणि त्यामुळे आम्ही सलमानला क्षमा मागण्यास सांगत आहोत. क्षमा मागायची नसेल, तर देवाला ठाऊक पुढे काय होईल. देव कुणाचाही अहंकार ठेवत नाही, असे विधान कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने ‘एबीपी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीला कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत देतांना केले. पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई अटकेत आहे. ‘प्रसिद्धीसाठी अभिनेता सलमान खान यांना धमकी दिली का?’, या प्रश्नावर उत्तर देतांना बिश्नोई याने वरील विधान केले. ‘प्रसिद्धीसाठी असे केले असते, तर आम्ही अभिनेते शाहरूख खान याची हत्या केली असती; परंतु सलमान खान याला प्रसिद्धीसाठी नाही, तर उद्देश ठेवून मारणार आहोत’, असेही तो म्हणाला.
‘Will Break His Ego Sooner Or Later’: Gangster Lawrence Bishnoi Issues Threat To Salman Khan #entertainment https://t.co/kchKZkkQ4X
— Indiatimes (@indiatimes) March 15, 2023
लॉरेन्स बिश्नोई पुढे म्हणाला की, आमच्या बिश्नोई समाजातील लोकांचा सलमान खान याच्यावर पुष्कळ राग आहे. त्याने कायम आमच्या समाजाला तुच्छ लेखले आहे. त्याच्यावर खटला चालू आहे; पण अद्यापही त्याने क्षमा मागितलेली नाही. आमच्या परिसरात प्राण्यांचा जीव घेतला जात नाही. झाडे तोडण्यास बंदी आहे; मात्र जिथे बिश्नोई समाजाची संख्या अधिक आहे, तिथे येऊन सलमान खान याने हरीणाची शिकार केली आहे. मी कधी ना कधी सलमान खान याचा अहंकार मोडणार आहे. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन क्षमा मागितली पाहिजे. सलमानने बिश्नोई समाजातील लोकांना पैशांचे आमीष दाखवले होते.
मुसेवालाची हत्या माझ्या भावांच्या हत्येचा सूड म्हणून केली !
गुरुलाल आणि विक्की हे माझे भाऊ होते. त्यांच्या हत्येत सिद्धू मुसेवालाचा हात होता. त्याच्या कुटुंबाशी आमचे कोणतेही मतभेद नाहीत. त्याच्या वडिलांशी आम्हाला देणेघेणे नाही, असा खुलासाही लॉरेन्स बिश्नोई याने या वेळी केला. तो पुढे म्हणाले की, मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांना निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे ते वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर ते मोर्चे काढत आहेत. सिद्धूच्या हत्येच्या प्रकरणी ५० जणांना अटक करण्यात आली आहे; मात्र या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली, तर अनेक लोक निर्दोष सुटतील.
संपादकीय भूमिका
|