राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे विधानमंडळाच्या कार्यालयाकडून परिपत्रक !

उपसभापतींकडून परिपत्रक रहित !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चक्क राष्ट्रवादीत ???

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे परिपत्रक विधीमंडळाच्या सचिव कार्यालयाकडून काढण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी १३ मार्च या दिवशी हे परिपत्रक सभागृहात वाचून दाखवले. सचिव कार्यालयाकडून झालेली ही चूक लक्षात येताच उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी हे परिपत्रक रहित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्याऐवजी त्यांच्याऐवजी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव परिपत्रकामध्ये लिहिण्यात आले होते. याविषयी सभागृहात निवेदन करतांना शशिकांत शिंदे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही शिंदेगटाकडून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे का ?’, असे उपरोधिक वक्तव्य केले. हा प्रकार ‘नजरचुकीने’ झाल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून देत यामध्ये सुधारणा करण्याची सूचना उपसभापतींनी दिली.

(सौजन्य : My Mahanagar Live)

संपादकीय भूमिका

अशा हास्यास्पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्यकारभार कसा करत असेल, याची कल्पना येते !