चित्रीकरणाच्या वेळी इंग्रजीतून विषय मांडतांना बालसाधिकेला वाटलेली भीती आणि स्वामी विवेकानंदांची कथा आठवून तसा भाव ठेवल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वाची आलेली प्रचीती

कु. सायली देशपांडे

१. चित्रीकरणाच्या वेळी ‘इंग्रजीतून विषय मांडायचा आहे’, हे कळल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना सतत प्रार्थना होणे

‘२.६.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमातील आम्हा ३ दैवी बालकांचे वेगवेगळ्या प्रबोधनपर विषयांवर चित्रीकरण करण्यात आले. हा विषय इंग्रजीत सांगून त्याचे चित्रीकरण करायचे होते. याविषयीचा निरोप मला उशिरा मिळाला. त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळी बोलायच्या इंग्रजी वाक्यांचा माझा सराव झाला नव्हता. मी सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करत होते, ‘तुम्हीच या आणि माझ्याकडून ही वाक्ये बोलून घ्या.’ चित्रीकरणापूर्वी सराव करतांनाही मला ती वाक्ये व्यवस्थित म्हणता येत नव्हती; पण मी बोलण्याचा प्रयत्न करत होते. वाक्ये पाठ होत नसल्याने ध्वनीचित्रकाखाली (व्हिडिओ कॅमेर्‍याखाली) ‘स्क्रीन’ (संगणकीय फलक) लावून त्यावर मला मी म्हणावयाची वाक्ये दाखवण्यात आली.

२. ध्वनीचित्रकासमोर बसल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना अंतर्मनापासून प्रार्थना होणे आणि गुरूंचे सामर्थ्य दर्शवणारी स्वामी विवेकानंदांची कथा आठवून ‘प.पू. गुरुदेवच बोलणार आहेत’, असा भाव ठेवता येणे

मी ध्वनीचित्रकासमोर (व्हिडिओ कॅमेर्‍यासमोर) बसल्यावर ‘मला बोलायला जमेल कि नाही ?’, अशी भीती वाटून माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांना अंतर्मनापासून प्रार्थना झाली, ‘गुरुमाऊली, तुम्हीच मला साहाय्य करा.’ त्या वेळी मला माझ्या आईने (श्रीमती धनश्री देशपांडे यांनी) सांगितलेली स्वामी विवेकानंद यांची एक कथा आठवली. ‘विवेकानंद पहिल्यांदाच इंग्रजीतून भाषण करणार होते. तेव्हा त्यांचे ‘गुरु (श्री रामकृष्ण परमहंस) स्वतः विवेकानंदांच्या पाठीमागे उभे राहून त्यांच्याकडून इंग्रजी बोलून घेत आहेत’, असे सर्वांना जाणवले.’

गुरूंचे सामर्थ्य दर्शवणारी ही कथा आठवल्यावर मी भाव ठेवला की, ‘मी बोलणार नसून प.पू. गुरुदेवच बोलणार आहेत आणि ते माझ्या पाठीमागे येऊन उभे आहेत’, या भावामुळे माझी भावजागृती होऊ लागली आणि माझ्याकडून सर्व वाक्ये भावपूर्ण रीतीने म्हटली गेली.

३. ध्वनीचित्रफीत पहातांना गुरुकृपेची आलेली प्रचीती !

अ. जेव्हा ही ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) प्रसारित करण्यात आली, तेव्हा ती ऐकून मला वाटले, ‘मी काहीच बोलले नसून ही सर्व गुरूंचीच कृपा आहे.’

आ. साधकांनी ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर मला सांगितले, ‘‘तू पुष्कळ छान बोललीस !’’

इ. एक साधक म्हणाला, ‘‘तू बोलत आहे, असे वाटतच नव्हते.’’ त्या वेळी मला कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाची प्रचीती आली.

४. कृतज्ञता

गुरुमाऊलींच्या कृपेने मला ही समष्टी सेवा करता आली आणि ही सेवा करत असतांना गुरूंचे अस्तित्वही अनुभवता आले. याबद्दल मी गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. सायली देशपांडे (वय १४ वर्षे आणि आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०२२)

‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध झालेल्या त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्यापैकी काही अनुभूती आल्यास त्यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा. अशा प्रकारे साधकांनी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या छायाचित्रांचा आध्यात्मिक उपायांसाठी लाभ करून घ्यावा.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले