खलिस्‍तानी आतंकवाद देशाला धोकादायक !

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. खलिस्‍तानवाद्यांनी पोलीस ठाण्‍यावर आक्रमण करून त्‍यांच्‍या अनुयायाची सुटका करणे

‘अमृतपाल सिंह हा स्‍वत:ला जर्नलसिंह भिंद्रनवालेचा अनुयायी म्‍हणून मिरवत आहे. त्‍याचा समर्थक लवप्रीत सिंह याला पंजाबच्‍या अजनाला पोलीस ठाण्‍यात डांबून ठेवण्‍यात आले होते. हे ठिकाण पाकिस्‍तानच्‍या सीमेपासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्‍या पोलीस ठाण्‍यावर २४ फेब्रुवारी या दिवशी आक्रमण करून खलिस्‍तानवादी लवप्रीत सिंहला घेऊन निघून गेले. आक्रमकांकडे बंदुका, तलवारी, भाले आणि अत्‍याधुनिक शस्‍त्रे होती. या घटनेविषयी माध्‍यमांनी चिंता व्‍यक्‍त केली. लवप्रीत सिंह याला सोडवून नेतांना खलिस्‍तानवाद्यांनी शीख पंथियांच्‍या धर्मग्रंथाची प्रतिकृती समवेत ठेवली होती. त्‍यामुळे तेथे ८०० पोलिसांचा बंदोबस्‍त असतांनाही ते काही करू शकले नाहीत. त्‍यांनी या खलिस्‍तानी मोर्च्‍याला प्रत्‍युत्तर दिले असते, तर खलिस्‍तान्‍यांनी पवित्र धर्मग्रंथावर आक्रमण झाल्‍याचा कांगावा केला असता आणि देशभर दंगली पेटवल्‍या असत्‍या. हा डाव लक्षात घेऊन पोलिसांनी संयम ठेवला आणि लवप्रीत सिंहसारख्‍या आतंकवाद्याला घेऊन जाऊ दिले. या सर्व प्रकरणाकडे केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. या प्रकरणात राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) लक्ष घातले आहे.

२. देशात खलिस्‍तानी आतंकवादाचे पुनर्जीवन !   

खलिस्‍तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले याला स्‍वतंत्र खलिस्‍तान राज्‍य हवे होते. यासाठी त्‍याने भारताविरुद्ध युद्ध पुकारले होते. त्‍यामुळे १९८० च्‍या दशकात खलिस्‍तान समर्थकांनी देशात अशांतता निर्माण केली होती. त्‍यांनी शीख पंथियांचे श्रद्धास्‍थान सुवर्ण मंदिराचा ताबा घेतला होता. तो सोडवण्‍यासाठी भारताच्‍या तत्‍कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी ‘ऑपरेशन ब्‍लू स्‍टार’ अभियान राबवले. त्‍यात अनेक खलिस्‍तानी आतंकवाद्यांसह भारतीय सेनेचे ८३ सैनिक हुतात्‍मा झाले. त्‍यामुळे अप्रसन्‍न झालेल्‍या खलिस्‍तान्‍यांनी वर्ष १९८४ मध्‍ये श्रीमती गांधी यांची हत्‍या केली. त्‍यानंतर अनेक वर्षे खलिस्‍तानी चळवळ शांत होती. अलीकडे ती पुन्‍हा डोके वर काढत आहे.

सध्‍या खलिस्‍तानवादी हे कॅनडा आणि ऑस्‍ट्रेलिया या देशांमध्‍ये जाणीवपूर्वक हिंदु मंदिरांवर आक्रमण करून मूर्ती फोडतात, तसेच तेथे खलिस्‍तानवाद्यांचा झेंडा लावतात. एवढेच नाही, तर त्‍यांनी नुकताच ब्रिस्‍बेन (ऑस्‍ट्रेलिया) येथील भारताच्‍या वाणिज्‍य दूतावासावर खलिस्‍तानी झेंडा लावला. २६ जानेवारी २०२१ या दिवशी खलिस्‍तानवाद्यांनी शेतकरी कायद्यांच्‍या निमित्ताने लाल किल्‍ल्‍याच्‍या परिसरात धुडगूस घातला. त्‍यात खलिस्‍तानवादी दीप सिद्धू हा मुख्‍य आरोपी होता. नंतर तो या संघटनेचा प्रमुख झाला. त्‍याने आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवालेच्‍या गावात एक कार्यक्रम आयोजित केला होता.

 ३. राष्ट्रद्रोही लोकांचा नि:पात होण्‍यासाठी सरकारला साहाय्‍य करणे आवश्‍यक !

खलिस्‍तानवादी आणि पाकिस्‍तानी गुप्‍तचर संस्‍था ‘आयएस्‌आय’ यांचा संबंध आहे का ? तसेच त्‍यांना आर्थिक रसद कोण पुरवत आहे ? याचाही शोध घेणे चालू आहे. त्‍यांच्‍यावर नियंत्रण मिळवण्‍यासाठी केंद्र सरकार निश्‍चितपणे रणनीती आखत असेल, यात काही शंका नाही. या खलिस्‍तानी चळवळीचा अपलाभ धर्मांध घेऊ शकतात. त्‍यासाठी नागरिकांनी जागरूक राहून राष्‍ट्र्रद्रोही लोकांचा नि:पात कसा होईल, यासाठी सरकारला साहाय्‍य करणे आवश्‍यक आहे.

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय. (२५.२.२०२३)