नाशिकसह धुळे आणि बुलढाणा जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतीपिकांना फटका !

नाशिक – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने उपस्थिती लावली आहे. याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा आणि फळबाग पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, तसेच पिकांवर रोग पडण्याची शक्यताही आहे.

धुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा आणि पपई पिकांना फटका !

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. गहू, हरभरा, पपई यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू अक्षरशः भुईसपाट झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने याची नोंद घेऊन पंचनामे करून हानीभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातही पाऊस !

बुलढाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस पडला. जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद परिसरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या पावसामुळे शेतीपिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका !

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सटाणा आणि कळवण तालुक्यांसह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, तसेच पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्‍यांचा औषध फवारणीचा व्यय वाढणार आहे.