भारतात कार्य करणार्‍यांना कायद्यांचे पालन करावे लागेल ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

बीबीसीच्या सर्वेक्षणावरून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांना सुनावले !

डावीकडून भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेवरली

नवी देहली – ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेवरली ‘जी-२०’च्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. या वेळी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी त्यांची द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत जेम्स क्लेवरली यांनी बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांवरील आयकर विभागाच्या सर्वेक्षणाचे सूत्र उपस्थित केले. त्यावर भारताचे डॉ. एस्. जयशंकर यांनी क्लेवरली यांना उत्तर देतांना ‘भारतात कार्यरत असलेल्या सर्व संस्थांनी संबंधित कायद्यांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे. मग ती कोणतीही संस्था असो’, असे सुनावले.

ब्रिटनच्या सरकारने यापूर्वी सांगितले होते की, ते बीबीसी कार्यालयांमधील भारतातील कर अधिकार्‍यांच्या सर्वेक्षणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

संपादकीय भूमिका 

ज्यांना जी भाषा समजते, त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे, हेच आता भारत करू लागला आहे, हे चांगले लक्षण आहे !