कोरोना नैसर्गिक नव्हता, तर जैविक युद्ध होते ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर यांचा दावा !

नवी देहली – संपूर्ण जगाला कोरोनाशी लढा द्यावा लागला. लोकांना २ वर्षे घरातच रहावे लागले. कोरोनाच्या प्रभावावर मी त्या वेळी म्हणालो होतो की, हा आजार नैसर्गिक नाही. हे काही देश आणि लोक यांचे षड्यंत्र आहे, हे जैविक युद्ध आहे. माझ्या शिष्यांनी मला असे न बोलण्याचा सल्ला दिला होता; कारण त्यामुळे वाद निर्माण झाला असता. मी जे म्हणत होतो, ते आता सिद्ध झाले आहे, असा दावा ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर यांनी त्यांच्या एका प्रवचनामध्ये केला. ‘मोठे देश आता म्हणत आहेत की, कोरोनाच्या विरोधातील लस फारशी उपयुक्त सिद्ध झाली नाही. त्यामुळे संसर्गाचा प्रसार थांबत नाही’, असेही श्री श्री रविशंकर म्हणाले.

श्री श्री रविशंकर म्हणाले की, आयुर्वेदाची औषधे वापरली जावीत, असे मला वाटले आणि त्यासाठी ‘एन्.ए.ओ.क्यू. १९’ औषध बनवले आणि १४ रुग्णालयांमध्ये त्याची चाचणी करण्यात आली. हे औषध आता कोरोनावरील उपचारांसाठी उपयोगात येत आहे. हे औषध परदेशातील अनेक मोठ्या विश्वविद्यालयांमध्ये पाठवण्यात आले. तेथील लोकांना समजले की, हे औषध कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरेल. ‘आपल्या देशाचा योग आणि आयुर्वेद यांवर आपली श्रद्धा असली पाहिजे’, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.