खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याच्या मागणीवरून विधानसभेचे कामकाज ३ वेळा तहकूब !

मुंबई, १ मार्च (वार्ता.) – खासदार संजय राऊत यांनी ‘विधीमंडळ चोरमंडळ आहे’, या केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी १ मार्च या दिवशी विधानसभेत संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली. या वेळी भाजप आणि शिवसेना यांच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.

शिवसेनेचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली. या वेळी सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळामुळे तालिका सभापती योगेश सागर यांनी विधानसभेचे कामकाज प्रथम १०, त्यानंतर २० मिनिटे आणि त्यानंतर ३० मिनिटे असे एकूण १ घंट्यासाठी तहकूब करण्यात आले. यामुळे विधानसभेचा प्रश्नोत्तराचा वेळ वाया गेला.

या वेळी आशिष शेलार म्हणाले, ‘‘संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे हा विधानसभा, तसेच सर्व सदस्यांचा अपमान आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे.’’ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कुठल्याही नेत्याला आणि व्यक्तीला विधीमंडळाविषयी आक्षेपार्ह विधान करण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाने शिस्त आणि नियम पाळायला हवेत; मात्र राऊत असे खरंच बोललेत का ? याची पडताळणी व्हायला हवी, असे मत व्यक्त केले.

संजय राऊत कोल्हापूर दौर्‍यावर असतांना वृत्तवाहिन्यांपुढे विधीमंडळ ‘चोरमंडळ’ असल्याचे वक्तव्य केले होते.