‘जे.एन्.यू.’ला टाळे ठोका !

छत्रपती शिवाजी महाराजांची दिनांकानुसार जयंती १९ फेब्रुवारी या दिवशी देशभरात मोठ्या उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विविध राज्‍यांचे मुख्‍यमंत्री आदींनी या दिवशी महाराजांना नमन केले. प्रत्‍येकाने महाराजांच्‍या शौर्याचे गुणगान केले; मात्र याच दिवशी देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात म्‍हणजे कुप्रसिद्ध असणार्‍या जे.एन्.यू.मध्‍ये साम्‍यवादी आणि हिंदुद्वेषी विद्यार्थी संघटनांच्‍या विद्यार्थ्‍यांनी महाराजांची जयंती साजरी करण्‍यास हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या विद्यार्थ्‍यांना विरोध करत त्‍यांनी ठेवलेली महाराजांची प्रतिमा कचर्‍याच्‍या डब्‍यात फेकून दिली. या संतापजनक कृतीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या विद्यार्थ्‍यांनी विरोध केला; मात्र संबंधित गुन्‍हेगार विद्यार्थ्‍यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या विद्यार्थ्‍यांचे म्‍हणणे आहे, ‘ज्‍या विद्यार्थ्‍यांनी येथे शिवजयंती साजरी करण्‍याचा प्रयत्न केला, त्‍यांनी या संदर्भात व्‍यवस्‍थापनाकडून अनुमती घेतलेली नव्‍हती. त्‍यामुळे त्‍याला आम्‍ही विरोध केला.’ यातून हेच लक्षात येते की, या साम्‍यवादी विद्यार्थ्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणतेही प्रेम आणि कृतज्ञता नाही. तसे असते, तर त्‍यांनी स्‍वतःहून शिवजयंती साजरी करण्‍यासाठी पुढाकार घेतला असता, जो त्‍यांनी घेतलेला नाही. याविषयी देशातील कथित पुरो(अधो)गामी पक्ष आणि संघटना यांनी तोंड उघडलेले नाही. राष्‍ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या नावाने कार्य करणार्‍या संघटना या घटनेविषयी गप्‍प आहेत. यातून ‘त्‍यांचे साम्‍यवादी संघटनांचे हिंदुद्वेषी विद्यार्थ्‍यांना समर्थन आहे का ?’, असा प्रश्‍न उपस्‍थित होतो. दुसरे म्‍हणजे ‘जर अनुमती न घेता शिवजयंती साजरी करण्‍यात येत आहे, तर त्‍याविषयी थेट प्रतिमा फेकून देण्‍याऐवजी या संदर्भात विश्‍वविद्यालयाच्‍या प्रशासनाकडे तक्रार का केली नाही ? प्रतिमा फेकून देण्‍याचा अधिकार या विद्यार्थ्‍यांना कुणी दिला ? जर येथे कुणी टिपू सुलतानची विनाअनुमती जयंती साजरी करू लागला, तर हे साम्‍यवादी विद्यार्थी तेव्‍हा अशीच कृती करतील का ?’, असे प्रश्‍न उपस्‍थित होतात. या घटनेतून आता लक्षात घ्‍यायला हवे की, जे.एन्.यू. मधील साम्‍यवाद्यांच्‍या राष्‍ट्र आणि हिंदु धर्म द्रोही कृत्‍यांची शंभरी भरली आहे. आता त्‍यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवण्‍यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्‍याची आवश्‍यकता आहे. ज्‍या छत्रपतींनी देहलीत येऊन औरंगजेबाला खडे बोल सुनावले आणि पुढील १०० वर्षांत त्‍यांच्‍या मावळ्‍यांनी देहलीवर भगवा ध्‍वज फडकावला, त्‍या महाराजांच्‍या नावाने सत्तेवर बसल्‍याचे कृतज्ञतापूर्वक सांगणार्‍यांनी आता साम्‍यवाद्यांचा योग्‍य बंदोबस्‍त कायमस्‍वरूपी करण्‍याची वेळ आली आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्‍यापासून या साम्‍यवाद्यांना धडा शिकवण्‍याचा प्रयत्न यशस्‍वी झालेला नाही; मात्र आता त्‍यावर परिणामकारक उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता आहे. यासाठी जे.एन्.यू.ला टाळे ठोकावे लागले, तरी त्‍याला हिंदु जनता विरोध करणार नाही. हिंदूंच्‍या शेकडो कोटी रुपयांच्‍या अनुदानावर चालणार्‍या या विश्‍वविद्यालयात घडणार्‍या हिंदुद्रोही घटना बंद झाल्‍याच पाहिजेत !

 गोहत्‍या कधी थांबणार ?

देहली येथे गोहत्‍या बंदी कायदा असतांनाही काही मुसलमानांनी मंदिराजवळच गोहत्‍या केली. पोलिसांनी या मुसलमानांना अटक केली आहे. त्‍यांना पुढे जामीन मिळेल आणि ते बाहेर येऊन कदाचित् पुन्‍हा गोहत्‍या करतील. जर त्‍याची माहिती पोलिसांना मिळाली, तर त्‍यांच्‍यावर पुन्‍हा कारवाई होईल अन्‍यथा ते गोहत्‍या करतच रहातील. त्‍यांच्‍यावरील खटल्‍याचा निकाल किती वर्षांनी लागेल आणि ते यात दोषी ठरतील किंवा नाही, हे तेव्‍हाच लक्षात येईल. अशी शेकडो प्रकरणे या देशात जेथे जेथे गोहत्‍या बंदी कायदा लागू आहे, तेथे घडत आहेत. गोहत्‍या केल्‍यामुळे एखाद्याला शिक्षा झाली आहे, अशी बातमी वाचायला मिळत नाही, यातून हेच लक्षात येते की, कितीही कायदे केले, तरी त्‍याचा जो परिणाम अपेक्षित आहे, तो मात्र साध्‍य होतांना दिसत नाही. देशात सहस्रो गुन्‍ह्यांच्‍या विरोधात कायदे आहेत आणि त्‍यांना शिक्षाही आहे; मात्र त्‍यामुळे ते गुन्‍हे घडायचे थांबले आहेत किंवा अल्‍प झालेले आहेत, असे कुणीही म्‍हणू शकणार नाही. कायदे केल्‍याने किंवा शिक्षेच्‍या भयाने गुन्‍हे थांबत नाहीत, असे भारतातच नव्‍हे, तर जगभरात दिसून येते. इस्‍लामी देशांतील कायदे हे शरीयतनुसार आहेत, तेथे कठोर शिक्षा दिली जाते, तेथेही गुन्‍हे थांबलेले आहेत, असे सांगता येत नाही. तरीही ज्‍यांच्‍याकडे गुन्‍हे रोखण्‍याचे दायित्‍व आहे, त्‍यांनी त्‍याकडे गांभीर्याने पहाण्‍याची आवश्‍यकता आहे. गोहत्‍या बंदी कायदा लागू होऊनही पोलीस निष्‍क्रीय रहात असल्‍याने किंवा भ्रष्‍टाचार करत असल्‍याने गोहत्‍या होत आहेत, हे गोरक्षक जेव्‍हा गोतस्‍करांना पकडून देतात, तेव्‍हा लक्षात येत असते. ‘जे गोरक्षक करू शकतात, ते सर्व यंत्रणा हातात असणारे पोलीस का करू शकत नाहीत ?’, असा प्रश्‍न सतत येत असतो. ज्‍या शासनकर्त्‍यांनी गोहत्‍या बंदी कायदा केलेला आहे, तेही नंतर याची कार्यवाही कशी होत आहे, याकडे किती पहातात ? हाही एक प्रश्‍नच आहे. ‘गोहत्‍या बंदी कायद्यामुळे हिंदूंची, गोप्रेमींची मते मिळणार’, इतका जर त्‍यांचा विचार असेल, तर मूळ उद्दिष्‍ट कसे साध्‍य होणार ? छत्रपती शिवाजी महाराजांनी गोहत्‍या करणार्‍या कसायाचा हात छाटला होता, हे उदाहरण आपल्‍या समोर आहे. आपण आता असे करू शकत नसलो, तरी कठोर होऊन कृती करण्‍यासाठी आपण किती प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, हेही पहाणे आवश्‍यक आहे. काही आठवड्यांपूर्वी मुंबईत गोरक्षकांनी धाड टाकून पोलिसांच्‍या साहाय्‍याने पकडलेले गोमांस पोलिसांनीच गायब केल्‍याचे समोर आले होते. असे जर होत असेल, तर गोहत्‍या बंदीच काय, कोणताही कायदा प्रभावीपणे राबवता येणार नाही आणि गुन्‍हे घडतच रहाणार नाहीत, तर त्‍यात वाढ होत राहील. काही राज्‍यांत लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी धर्मांतरविरोधी कायदा आणला, तरी लव्‍ह जिहादच्‍या घटना थांबलेल्‍या नाहीत, असेच अन्‍य कायद्यांचेही आहे.