पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे पुन्हा अपघात !

टोंक, सांतइनेज येथे रस्त्याच्या शेजारी खोदलेल्या चरात मलवाहू टँकर कलंडला

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, १० फेब्रुवारी (वार्ता.) – पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे अपघातांची मालिका चालूच आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना ताजी असतांनाच १० फेब्रुवारी या दिवशी मालवाहू टँकर रस्त्याच्या शेजारी खोदलेल्या चरात कलंडला. या वेळी सुदैवाने टँकरचा चालक आणि साहाय्यक वाचले.

टोंक, सांतइनेज येथून टँकर कांपाल येथे जातांना हा अपघात घडला. क्रेनच्या साहाय्याने टँकर बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर त्या ठिकाणी असलेल्या अभियंत्याला स्थानिकांनी धारेवर धरले; मात्र अभियंत्याने स्वतःचे दायित्व झटकत अपघात टँकरचालकाच्या चुकीमुळे झाल्याचा दावा केला. अभियंता म्हणाला, ‘‘काम चालू असतांना टँकर या रस्त्याने का आणला ? ‘काम चालू आहे’, असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत; मात्र वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात.’’

‘स्मार्ट सिटी’ची कामे प्रलंबित ठेवल्यास पावसाळ्यात पणजी शहर तुंबणार ! – टुगेदर फॉर पणजी असोसिएशन

पणजी – ‘जी-२०’ परिषदेसाठी ‘स्मार्ट सिटी’ची कामे मार्चनंतर प्रलंबित ठेवली जाणार आहेत. सरकारने या अनुषंगाने एक आदेश काढला आहे. ‘स्मार्ट सिटी’ची कामे प्रलंबित ठेवल्यास पावसाळ्यात पणजी शहर तुंबणार आहे.

यासाठी सरकारने ‘जी-२०’ परिषदेच्या बैठकांसाठी अन्य शहराची निवड करून पणजी येथील ‘स्मार्ट सिटी’ची कामे चालू ठेवून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, अशी मागणी ‘टुगेदर फॉर पणजी असोसिएशन’ने केली आहे.