साधिकेचे डोके पुष्‍कळ दुखत असतांना तिने गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि त्‍यांनी सूक्ष्मातून सांगितलेला उपाय केल्‍यावर तिला पाच मिनिटांतच शांत झोप लागून तिची डोकेदुखी न्‍यून होणे 

सौ. कंचन शर्मा

‘गेल्‍या वर्षभरापासून मला डोके, डोळे आणि नाक या ठिकाणी कंपने जाणवून जडपणा जाणवायचा. माझे डोळे लाल होऊन सुजायचे, तसेच माझे डोके जड होऊन मला बधीरपणा जाणवायचा. वातावरणात पालट झाला की, माझ्‍या त्रासांत वाढ व्‍हायची.

एकदा रात्री माझे डोके पुष्‍कळच दुखत होते. त्‍या वेळी मी परात्‍पर गुरुदेवांना कळवळून हाक मारली, ‘हे गुरुमाऊली, मला या त्रासातून सोडवा. एवढ्या रात्री मी रुग्‍णालयात जाऊ शकत नाही.’ तेव्‍हा माझ्‍या हृदयातून अकस्‍मात् मला गुरुदेवांचा आवाज ऐकू आला ‘तुझे डोके दुखत आहे, त्‍या भागाच्‍या नाकपुडीत गाईचे तूप गरम करून घाल.’

मी त्‍यांनी सांगितल्‍यानुसार केले. तेव्‍हा मला पाच मिनिटांत शांत झोप लागली आणि माझी डोकेदुखी न्‍यून झाली. नंतर मी हा प्रयोग अनेक वेळा केल्‍यावर मला होत असलेला त्रास ५० ते ६० टक्‍के इतक्‍या प्रमाणात उणावला.’ (‘प्रत्‍यक्षात आयुर्वेदातही डोके दुखत असतांना नाकात तूप घालण्‍याचा उपाय सांगितला आहे.’- वैद्य मेघराज पराडकर)

– सौ. कंचन श्‍याम शर्मा, अमरावती (१३.७.२०२१)

  • सूक्ष्म : व्‍यक्‍तीचे स्‍थूल म्‍हणजे प्रत्‍यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्‍वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्‍या पलीकडील म्‍हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्‍या काही व्‍यक्‍तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्‍या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्‍लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. – संपादक