‘घरातील एक व्‍यक्‍ती साधनेला लागली, तर पूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो’, याची गुरुदेवांच्‍या कृपेमुळे साधिकेला आलेली प्रचीती !

‘मी सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करते. मला साधनेसाठी विरोध असल्‍याने मी सनातनच्‍या आश्रमात राहून साधना करते. मी मागील १० वर्षे घरी गेले नाही. या कालावधीत माझा कुटुंबियांशी संपर्क नाही. त्‍यांनी अनेक वेळा ‘मी घरी यावे’, यासाठी प्रयत्न केले. त्‍यांचा १० वर्षांपूर्वी मला तीव्र विरोध होता. त्‍यांचा सनातन संस्‍था, तसेच सनातनचे साधक यांच्‍यावर राग असायचा. या परिस्‍थितीत साधना करत असतांना ‘मला क्षणोक्षणी गुरुकृपा कशी अनुभवता आली’, याविषयी प्रस्‍तुत लेखात दिले आहे.

‘घरातील एक व्‍यक्‍ती साधनेला लागली, तर पूर्ण कुटुंबाचा आणि त्‍या कुळाचा उद्धार होतो’, हे पूर्वी सत्‍संगात ऐकले होते. याची अनुभूती मी घेत आहे. परात्‍पर गुरु डॉ. आठवले, खरोखरच तुम्‍हीच विश्‍वगुरु आहात. तुम्‍हीच ईश्‍वर आहात. साधकांच्‍या रक्षणासाठी तुम्‍हीच अवतार घेतलेले विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊली आहात.

१. साधिकेने पूर्णवेळ साधना चालू करण्‍यापूर्वी तिच्‍या घरातील परिस्‍थिती

अ. बाबांकडून आम्‍हाला कसलेेच साहाय्‍य मिळत नव्‍हते. आई खानावळ चालवायची. त्‍यातून सर्व घरखर्च चालायचा. मी अधिकोषात नोकरी करत होते.

आ. पूर्वी माझे बाबा दारू प्‍यायचे, सिगारेट ओढायचे आणि घरी भांडणे करायचे. आमची आर्थिक परिस्‍थिती बेताची आहे. अनेक वेळा नातेवाईकही आई-बाबांना ‘तुम्‍ही मुलींवर कसे संस्‍कार केले ?’, असे म्‍हणायचे.

२. ‘श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुमाऊलीच घर सांभाळत आहेत’, याची अनुभूती येणे

२ अ. साधिका पूर्णवेळ साधना करायला लागल्‍यापासून घरी कोणतीच अडचण न येणे : गुरुदेवांच्‍या कृपेने मी पूर्णवेळ साधना करू लागल्‍यापासून घरी कोणतीच अडचण आली नाही. ‘गुरुदेवच सर्वकाही करत आहेत. तेच माझे घरही सांभाळत आहेत. पूर्वीच्‍या काळी संत जनाबाई, संत तुकाराम महाराज यांना विठ्ठल साहाय्‍य करायचा. त्‍यांचा प्रपंच चालवायचा. कलियुगात श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुमाऊलीच माझे घर सांभाळत आहे’, याची मी अनुभूती घेत आहे.

१. गुरुदेवांच्‍या कृपेने लहान बहिणीचे लग्‍न पुष्‍कळ चांगल्‍या प्रकारे पार पडले. बहिणीचे लग्‍न कोणतेही कर्ज न होता पार पडले.

२. आईने ‘मी घरी यावे’, यासाठी पुष्‍कळ प्रयत्न केले; मात्र देवाच्‍या कृपेने प्रत्‍येक वेळी मला स्‍थिर रहाता आले. देवाने प्रत्‍येक अडचणीत मला साहाय्‍य केले.

२ आ. कुटुंबियांच्‍या रुग्‍णाईत स्‍थितीत देवाने केलेले साहाय्‍य

१. एकदा माझी आई प्रसाधनगृहात पडली होती. त्‍या वेळी माझ्‍या मावशीने आमच्‍या घरी राहून आईची सेवा आणि घरची कामे केली.

२. पाच-सहा वर्षांपूर्वी आई-बाबांना ‘चिकन गुनिया’ झाला होता. त्‍यांना ताप आला होता. त्‍यांच्‍या साहाय्‍याला घरी कुणी नव्‍हते. आईने मामाला बोलावले. मामा लगेच आई-बाबांच्‍या साहाय्‍याला गेला.

३. बाबांचे डोळ्‍यांचे शस्‍त्रकर्म झाले. त्‍या वेळीही कोणतीच अडचण आली नाही.

अशा अनेक प्रसंगांत ‘गुरुदेवच घरची परिस्‍थिती सांभाळत आहेत’, याची अनुभूती येते.

३. कुटुंबियांमध्‍ये जाणवलेले पालट

३ अ. मागील ७ – ८ वर्षांपासून बाबांची सर्व व्‍यसने बंद झाली आहेत.

३ आ. मागील काही दिवसांपासून आई स्‍थिर असल्‍याप्रमाणे वाटणे आणि मुलीला घरी येण्‍याविषयी फारसा आग्रह न करणे : मागील वर्षी माझ्‍या आजीचे निधन झाले. त्‍या वेळी मी आईला भ्रमणभाष केला असता ती स्‍थिर होती. तेव्‍हा तिच्‍या बोलण्‍यातून ‘काही झालेच नाही’, असे वाटत होते. गेल्‍या काही दिवसांपासून आई स्‍थिर असल्‍याप्रमाणे वाटते. ती आता घरी येण्‍याविषयी मला फारसा आग्रह करत नाही. ‘गुरुदेव माझ्‍या आईची आंतरिक साधना करवून घेत आहेत’, असे मला वाटले.

३ इ. बहीण आणि तिचे यजमान यांच्‍या स्‍वभावात पालट जाणवणे : माझ्‍या एका बहिणीचा स्‍वभाव जरा रागीट होता. आई-बाबा आणि दुसरी बहीण यांना तिच्‍याशी जुळवून घेता येत नव्‍हते[. गेल्‍या काही मासांपासून ती स्‍वामी समर्थ संप्रदायाची साधना करत आहे. त्‍यामुळे ती आणि तिचे यजमान यांच्‍या स्‍वभावात पालट जाणवतो. गुरुदेवांच्‍या कृपेमुळे त्‍यांच्‍यात पालट झाला आहे.

४. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे गुरुमाऊली, तुमच्‍या कृपेने मला मायेतून, सर्व बंधनातून मुक्‍त होता आले, त्‍याबद्दल मी तुमच्‍या चरणी कृतज्ञ आहे. ‘हे गुरुदेवा, तुम्‍ही जी कृपा करत आहात, त्‍याबद्दल मला क्षणोक्षणी कृतज्ञ रहाता येऊ दे. माझ्‍याकडून अखंड गुरुसेवा करवून घ्‍या’, अशी मी तुमच्‍या चरणी प्रार्थना करते.’

– एक साधिका, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक