मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक

  • मुख्यमंत्री डॉ. सावंत कर्नाटकात भाजपच्या प्रचारसभेला उपस्थित

  • म्हादईचे पाणी वळवू पहाणार्‍या कर्नाटकविषयी काहीच न बोलल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर विरोधी पक्षांची टीका

पणजी, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यास पहात असल्याने गोव्यात कर्नाटक सरकारच्या विरोधात रोष असतांनाच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी कर्नाटक येथे भाजपच्या विविध प्रचारसभांना उपस्थिती लावून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकमध्ये पुन्हा भाजपचे ‘डबल इंजिन सरकार’ (‘डबल इंजिन सरकार’ म्हणजे केंद्रात भाजपचे मोदी सरकार आणि कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार) सत्तेवर आले पाहिजे, असे म्हटले. केवळ ‘डबल इंजिन’ सरकारच ‘नवीन कर्नाटक’चे स्वप्न साकार करू शकणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांतील नवीन भारताची उभारणी केली जाऊ शकते. यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर गोव्यात विरोधकांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या भाषणात म्हादईसंबंधी कोणताही उल्लेख करण्याचे टाळले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धाडस दाखवणे आवश्यक होते ! – युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटककडून दादागिरी चालू आहे. यावरून गोमंतकीय पेटून उठलेले असतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक येथे जाऊन ‘विद्यमान भाजप सरकारच सत्तेवर आले पाहिजे’, असे सांगत आहेत. जीवनदायिनी म्हादईला आपली आई म्हणणार्‍या मुख्यमंत्र्यांनी म्हादईचे पाणी वळवू देणार नाही, अशी गर्जना करण्याचे धाडस दाखवणे आवश्यक होते.

मुख्यमंत्र्यांना राज्याचे हित महत्त्वाचे नाही ! – विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड

आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सभागृह समितीसमोर येऊन त्यांनी म्हादईसंबंधी खरी बाजू मांडण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांना राज्याचे हित महत्त्वाचे नाही, तर ते केवळ पक्षश्रेष्ठी सांगतील तसे करत आहेत.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा