प्रशासनाने एका रात्रीत सिद्ध केला नवीन प्रभाग !
नागपूर – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (‘मेयो’ने) त्वचारोग विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करण्यासाठी ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’कडे (एन्.एम्.सी.) निरीक्षणासाठी अर्ज केला होता. निरीक्षण होणार असल्याची माहिती मिळताच मेयो प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करत अवघ्या २४ घंट्यांत मध्यरात्रीच्या सुमारास नवीन प्रभाग सिद्ध करण्याचा प्रयोग केला; मात्र निरीक्षण चालू असतांनाच परिचारिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे पितळ उघडे पाडत पोलखोल केली.
यापूर्वी शासनाच्या अंदाज समितीने कठोर शब्दात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ताशेरे ओढले होते. त्या वेळी मेयोतील ४० ‘एम्.बी.बी.एस्.’च्या जागांना कायम करण्यासाठी अनेक समस्या लपवण्याचा प्रयत्न होत होता. वसतीगृह नसतांना अनेक विद्यार्थी त्याच्याअभावी मेयो परिसरातील उपाहारगृहात रहात असत. प्रादेशिक मनोरुग्णालयातील खोल्यांमध्ये खाटा दाखवण्यात येत होत्या. ही लपवाछपवी काही वर्षांसाठी बंद होती; परंतु पुन्हा एकदा खोटे चित्र उभे करण्याचा प्रकार मेयो रुग्णालयात झाला. प्रशासनाचे खोटे रूप ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’च्या पथकासमोर आणणे हाच या आंदोलनाचा उद्देश होता, असे परिचारिकांनी सांगितले.