श्रीरामपूर नगरपालिका करापोटी घेतलेल्‍या रकमेचा योग्‍य विनियोग करत नसल्‍यामुळे विश्‍व हिंदु परिषदेचे आंदोलन !

श्रीरामपूर – शहरातील भाजी मंडई, मध्‍यवस्‍तीतील खेळण्‍याचा बगीचा, वाहतूक नियंत्रित करणारे दिवे, मटण मार्केट शहरातील नवीन उभारलेल्‍या संकुलांमधील वाहन व्‍यवस्‍था, तसेच स्‍वच्‍छतागृहे आदी गोष्‍टी बंद स्‍थितीमध्‍ये आहेत. पालिका प्रशासन बँड बाजा लावून सक्‍तीची कर वसुली करते; पण करापोटी जमा झालेल्‍या रकमेचा योग्‍य विनियोग करत नसल्‍यामुळे विश्‍व हिंदु परिषदेने वाहतूक नियंत्रण करणार्‍या दिव्‍याला पुष्‍पहार घालून आंदोलन केले. झोपेचे सोंग घेतलेल्‍या प्रशासनाला कधी जाग येणार ? असा प्रश्‍न या वेळी विहिंपचे तालुकाप्रमुख अमित मुथा यांनी विचारला.

पूर्वी श्रीरामपूर शहर हे प्रशस्‍त रस्‍त्‍यांसाठी राज्‍यात ओळखले जायचे; मात्र पालिकेच्‍या ढिसाळ कारभारामुळे अतिक्रमित शहर म्‍हणून याची ओळख होत आहे. ही सर्व परिस्‍थिती सुधारावी आणि या सर्व प्रश्‍नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे यासाठी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, मातृशक्‍ती दुर्गा वाहिनी श्रीरामपूर प्रखंड यांनी बंद वाहतूक नियंत्रित दिव्‍याला पुष्‍पहार घालून नगरपालिकेचा निषेध केला. या वेळी तालुकाध्‍यक्ष, प्रखंड मंत्री, दुर्गा वाहिनीच्‍या संयोजिका, भाजप महिला आघाडी, भाजप ओबीसी महिला आघाडी आदींनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

संपादकीय भूमिका

प्रशासनाच्‍या ढिसाळ कारभाराचे उदाहरण ! कर रूपाने भरलेल्‍या पैशांचा विनियोग कुठे आणि कशासाठी होतो ? हे प्रत्‍येक नागरिकांनी आता सजगपणे विचारायला हवे, तरच प्रशासनाचा कारभार सुधारेल !