‘सध्याचे तथाकथित विज्ञानवादी थोडीशी प्रगती करून भारतीय संस्कृतीवर टीका करण्यात धन्यता मानतात. सध्या प्रगत राष्ट्रांनी निर्माण केलेल्या ‘मिसाईल’ची (क्षेपणास्त्राची) अचूकता १ ते १० मीटर असते; याउलट परमेश्वराने निर्माण केलेल्या ८४ लक्ष योनीतील एका सागरी कासवीची अचूकता (पिन पॉईंट) आश्चर्यचकित करणारी आहे !
‘ऑलिव्ह रिडले’ नावाच्या सागरी कासवाची मादी एका पौर्णिमेच्या रात्री पूर्ण भरतीच्या वेळी समुद्रकिनार्यावर येते आणि आपल्या पायाच्या नखांनी (‘फिन्स’नी) वेगवेगळ्या ठिकाणी ३ – ४ खड्डे बनवते. त्यांतील एका खड्डयात ती १०० च्या आसपास अंडी घालते. पूर्वी कोल्ह्यांची संख्या अधिक होती. कोल्हे प्रत्येक पौर्णिमेला येऊन कासवीची अंडी खाण्यासाठी कासवी येण्याची वाट बघायचे. त्यांना फसवण्यासाठी कासवी ३ – ४ खड्डे बनवते.
कासवाची मादी बरोबर एक मासाने, म्हणजे भारतीय पंचांगानुसार पुढच्या पौर्णिमेला अंडी घातलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी परत येते. ती अगदी बरोबर (‘पिन पॉईंट अॅक्युरसी’ने) अंडी घातलेल्या खड्ड्याजवळ येते. तिच्याजवळ कुठलाही ‘जी.पी.एस्.’ नाही, ‘सेन्सर’ नाही, ना कुठले यंत्र, तरीही इतरत्र केलेल्या खड्ड्यांकडे न जाता ती अचूकतेने अंडी असलेल्या खड्ड्याकडे जाते. खड्ड्यावरील वाळू बाजूला करून पिल्ले समवेत घेऊन ती पुन्हा समुद्रात निघून जाते. यातील महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आपण कुठलीही वस्तू आता वाळूत खड्डा करून लपवली, तर दुसर्या दिवशी कुठल्याही खुणेविना ती जागा मिळणे अशक्य असते; कारण समुद्रकिनारी २४ घंटे वारा उलट-सुलट दिशेने वहात असतो आणि समवेत पाण्यामुळे वाळूही हलत असते. त्यामुळे तेथे कुठलीही खूण रहात नाही आणि आपण ती वस्तू मिळवू शकत नाही.
वरील गोष्टीवरून लक्षात येते, ‘मनुष्य विज्ञानाचा अहंकार आणि लालसा यांपोटी निसर्गचक्रात पालट करण्याचे प्रयत्न करतो. त्याचे परिणाम तो आता पूर, त्सुनामी, भूकंप या नैसर्गिक आपत्तींच्या रूपात भोगत आहे आणि तरीही तो स्वतःला निर्दोष समजत आहे; याउलट भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. ती पंचमहाभूतांना वंदन करायला शिकवते. तुलना केल्यास भारतीय संस्कृतीच खरी विज्ञानवादी आहे; कारण ती पूर्ण ज्ञानावर आधारलेली आहे !’ (२६.४.२०२१)
– श्री. सागर चव्हाण, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.