कोरोनासाठी घेतलेल्‍या औषधांनी अन्‍य विकारांचा त्रास होऊ लागल्‍यावर उपचारांसाठी रुग्‍णालयात असतांना श्री. अभिजित सावंत यांनी अनुभवलेली परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा !

या संदर्भात काल प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण श्री. अभिजित सावंत उपचारांसाठी रुग्‍णालयात असतांना त्‍यांनी अनुभवलेली गुरुकृपा याविषयी पाहिले. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/651774.html
श्री. अभिजित सावंत

९. कोरोनामुळे रुग्‍णाईत असतांना घेतलेल्‍या औषधांमुळे रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढणे आणि त्‍यामुळे पुन्‍हा तातडीने रुग्‍णालयात भरती व्‍हावे लागणे

‘मला कोरोना झालेला असतांना घेतलेल्‍या औषधांमुळे माझ्‍या शरिरातील साखरेचे प्रमाण वाढले. त्‍यामुळे मी एका नावाजलेल्‍या प्रयोगशाळेत २ – ३ वेळा साखर तपासून घेतली. ते मला केवळ ‘साखरेचे प्रमाण फार अधिक आहे’, असे सांगून पुनःपुन्‍हा रक्‍त तपासणीसाठी बोलावत होते. मी त्‍यांना थोडे स्‍पष्‍टपणे विचारल्‍यावर त्‍यांनी मला सांगितले, ‘‘साखरेचे प्रमाण ८०० आहे.’’ (साखरेचे प्रमाण ६०० च्‍या पुढे गेल्‍यास व्‍यक्‍ती कोमात जाऊ शकते. – डॉ. मराठे) हे सर्व मी वैद्य धुरी यांना सांगितल्‍यावर ते मला म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही लवकरात लवकर रुग्‍णालयात भरती व्‍हा.’’

१०. घराजवळच्‍या रुग्‍णालयात तातडीने भरती होण्‍यासाठी जाणे, ते रुग्‍णालय स्‍त्रीरोग आणि लहान मुले यांचे असूनही त्‍यांनी प्रसंग पाहून भरती करून घेणे

माझा भाऊ आशिष याने मला घराजवळ असलेल्‍या रुग्‍णालयात भरती करण्‍यासाठी नेले. ते रुग्‍णालय महिला आणि लहान मुले यांच्‍याशी संबंधित रोगांसाठीचे असल्‍यामुळे ते असे रुग्‍ण भरती करून घेत नाहीत; पण माझ्‍या रक्‍तातील वाढलेल्‍या साखरेच्‍या अधिक प्रमाणामुळे तातडी होती. तेव्‍हा तेथील आधुनिक वैद्य केतन पंडित म्‍हणाले, ‘‘मी कधी अशा रुग्‍णांवर उपचार केले नाहीत; पण तातडी असल्‍यामुळे मी तुम्‍हाला भरती करून घेतले.’’ त्‍यांनी गतीने सर्व चाचण्‍या करून अभ्‍यासपूर्ण उपचार चालू केले. ‘परम पूज्‍य, ते त्‍यांच्‍या ओळखीच्‍या आधुनिक वैद्यांना दूरभाष करून त्‍यांचे मार्गदर्शन घ्‍यायचे आणि मला ‘ते कुठला उपचार कशासाठी करत आहे’, हे समजावून सांगायचे.’ असे प्रयत्न करून त्‍यांनी मला बरे केले.’

११. श्री साईभक्‍त असलेले आधुनिक वैद्य केतन पंडित !

११ अ. रुग्‍णालयातील आधुनिक वैद्य केतन पंडित यांनी जिज्ञासेने साधकाच्‍या भ्रमणभाषवरील नामजप आणि अन्‍य विकारांवरील नामजप यांविषयी जाणून घेणे : आधुनिक वैद्य केतन पंडित अतिशय प्रेमळ आणि सात्त्विक आहेत. ते अतिशय प्रेमाने माझ्‍या पाठीवरून हात फिरवून माझी विचारपूस करायचे. माझ्‍या भ्रमणभाषवर कोरोना निवारणासाठी असलेला नामजप आणि मंत्र सतत चालू असायचे. ते ऐकून त्‍यांनी जिज्ञासेने साधना आणि सनातन संस्‍था यांविषयी सर्व जाणून घेतले. ते एक घंटा आमच्‍याशी (आशिष आणि मी) अध्‍यात्‍माविषयी बोलले.

मी बरा झाल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘तुमचे अहवाल सामान्‍य (नॉर्मल) आल्‍यामुळे काल रात्री मी शांतपणे झोपू शकलो.’’ त्‍यांच्‍या या वाक्‍याने ‘ते त्‍यांच्‍याकडे आलेल्‍या रुग्‍णांची किती काळजी घेतात ?’, हे माझ्‍या लक्षात आले.

११ आ. आधुनिक वैद्य केतन पंडित रात्री सर्व दायित्‍व श्री साईचरणी सोपवून निश्‍चिंत होत असणे : आधुनिक वैद्य केतन पंडित श्री साईबाबांचे भक्‍त आहेत. ते आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘सर्व रुग्‍ण सांभाळणे’, हे माझे दायित्‍व आहे. रात्री मी श्री साईबाबांच्‍या चरणांवर डोके ठेवून माझे दायित्‍व आणि मला स्‍वतःलाही त्‍यांच्‍या चरणी समर्पित करतो. ‘श्री साईबाबा सर्व सांभाळणार आहेत’, याची मला पूर्ण निश्‍चिती असते.’’

‘परम पूज्‍य, असेे प्रेमळ आणि काळजी घेणारे आधुनिक वैद्य मिळणे’, ही केवळ आणि केवळ तुमची अनमोल अन् अलौकिक कृपाच आहे.’

१२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची बुद्धीच्‍या पलीकडील अनुभवलेली अपार कृपा आणि प्रीती !

१२ अ. मूत्रपिंडाशी संबंधित विकार उद़्‍भल्‍यावर चांगले आणि प्रेमाने उपचार करणारे आयुर्वेदाचे वैद्य संदेश चव्‍हाण ! : त्‍या काळात माझ्‍या रक्‍तातील ‘क्रिएटिनीन’ (रक्‍तातील एक मलद्रव्‍य, याचे रक्‍तातील प्रमाण वाढल्‍यास मूत्रपिंडाशी संबंधित विकार असल्‍याचे निदान होते.) वाढले होते. त्‍यामुळे ‘मूत्रपिंडाशी संबंधित काही बिघाड झाला असावा’, असे निदान झाले. तेव्‍हा ‘मूत्रपिंड खराब झाले, तर आपल्‍याला अधू जीवन जगावे लागेल’, या विचाराने मी चिंतित झालो. मला ते स्‍वीकारता येत नव्‍हते. रामनाथी आश्रमातील वैद्यांना विचारून मी कुर्ला (मुंबई) येथील आयुर्वेदीय वैद्य संदेश चव्‍हाण यांच्‍याकडे गेलो. त्‍यांनी माझ्‍यावर उपचार चालू केले. त्‍यांनी उपचाराच्‍या पहिल्‍याच दिवशी मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘तुम्‍हाला औषध घेतल्‍यावर काही अडचण आली नाही ना ?’’ अशी विचारपूस करणारे माझ्‍या आयुष्‍यात भेटलेले हे पहिलेच वैद्य आहेत.

१२ आ. रुग्‍णाला चिंतामुक्‍त करण्‍यासाठी आश्‍वस्‍त करणारे वैद्य संदेश चव्‍हाण !: वैद्य संदेश चव्‍हाण आणि त्‍यांची पत्नी (वैद्या (सौ.) गायत्री चव्‍हाण) यांचा प्रत्‍येक रुग्‍णाविषयीचा सेवाभाव कौतुकास्‍पद आहे. वैद्य संदेश चव्‍हाण मला म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही ‘क्रिएटीनीन’ची काळजी कशाला करता ? तुम्‍हाला काही होणार नाही. लागले, तर मी तुम्‍हाला माझे मूत्रपिंड देईन.’’ परम पूज्‍य, असे कुणी बोलणेही तुमच्‍या कृपेविना शक्‍यच नाही. एका सामान्‍य अनोळखी रुग्‍णाला कुणी वैद्य असे म्‍हणेल का ? ही केवळ तुमचीच अनमोल कृपा आहे.

परम पूज्‍य, घरी असतांना मला बरे वाटत नसल्‍याने मी झोपलो होतो. तेव्‍हा माझ्‍या कपाळावर मी तुमचा कोमल आणि प्रीतीमय स्‍पर्श अनुभवला. तेव्‍हा मला वाटले, ‘माझ्‍या कपाळावर हात ठेवून तुम्‍ही माझे प्रारब्‍ध नष्‍ट करत असून ‘तुम्‍ही सतत माझ्‍या समवेत आहात. तुम्‍ही माझा उद्धार करत आहात.’ मी तो कोमल आणि हवाहवासा वाटणारा परमेश्‍वरीय प्रीतीमय स्‍पर्श आता टंकलेखन करतांनाही अनुभवत आहे.’

१३. कृतज्ञता !

परम पूज्‍य, ‘जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त होणे किंवा मोक्ष मिळणे’, हे सर्वकाही तुमच्‍या चरणांशीच आहे. मी कितीही वेळा अनंत कोटी कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे !’

– आपल्‍या अनंत कोटी ऋणात राहू इच्‍छिणारा,

श्री. अभिजित सावंत, ढवळी, फोंडा, गोवा. (८.१०.२०२१)


६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. शालिनी सावंत (वय ६८ वर्षे) यांनी त्‍यांचा मुलगा श्री. अभिजित सावंत कोरोनाने रुग्‍णाईत असतांना त्‍यांनी त्‍याच्‍यासाठी नामजप करतांना ठेवलेले भाव !

‘अभिजितला ‘कोरोना’ झाल्‍यावर सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्‍याला आरंभी ४ घंटे आणि नंतर त्‍याची प्रकृती अधिक बिघडल्‍यावर ८ घंटे नामजप करायला सांगितला. त्‍याच्‍यासाठी नामजप करतांना मी पुढील भाववृद्धी होण्‍यासाठी प्रयोग करायचे.

सौ. शालिनी सावंत

१. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले अभिजितच्‍या डोक्‍यावर हात ठेवत आहेत आणि त्‍यामुळे अभिजितच्‍या शरिरातील काळी शक्‍ती नष्‍ट होऊन त्‍याचे शरीर चैतन्‍याने भारित होत आहे’, असा भाव ठेवणे

मी प्रतिदिन सकाळी ९.३० ते १० या वेळेत अभिजितला सूक्ष्मातून परम पूज्‍य गुरुमाऊलीच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) खोलीत घेऊन जायचे आणि त्‍याला त्‍यांच्‍या चरणी क्षमायाचना करायला सांगून त्‍यांच्‍या चरणांवर डोके ठेवून नमस्‍कार करायला सांगायचे. तो त्‍यांना नमस्‍कार करून उठल्‍यानंतर ‘परम पूज्‍य त्‍याच्‍या डोक्‍यावर हात ठेवत आहेत आणि त्‍यांच्‍या हातातील चैतन्‍याने अभिजितच्‍या शरिरातील प्रत्‍येक अवयव, पेशीपेशी आणि चक्रे यांमधील काळी शक्‍ती नष्‍ट होत आहे अन् त्‍याचे शरीर चैतन्‍याने भारीत होत आहे’, असा भाव ठेवायचे.

२. जेव्‍हा अभिजितची प्रकृती फार बिघडायची, तेव्‍हा मी त्‍याला सूक्ष्मातून परम पूज्‍य गुरुमाऊलीच्‍या खोलीत नेऊन त्‍यांच्‍या पलंगाखाली झोपवायचे.

३. आश्रमात यज्ञ चालू झाल्‍यावर प्रतिदिन संध्‍याकाळी सूक्ष्मातून अभिजितला यज्ञस्‍थळी आणून बसवायचे आणि ‘तो यज्ञाचे चैतन्‍य ग्रहण करत आहे’, असा भाव ठेवायचे.

४. अभिजितसाठी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ज्‍या देवतांचा नामजप सांगायचे, तो नामजप करतांना ‘ती देवता अभिजितच्‍या सप्‍तचक्रांवर चैतन्‍य प्रक्षेपित करत आहे’, असा भाव ठेवायचे.

‘परम पूज्‍य गुरुमाऊली, एवढ्या कठीण प्रसंगात आपल्‍या अपार कृपेमुळे मी शांत आणि स्‍थिर राहू शकलेे. भीतीचा लवलेशही माझ्‍या मनाला स्‍पर्श करू शकला नाही. ही अभूतपूर्व मनाची शांतता केवळ या भूमंडळावर तुम्‍हीच देऊ शकता.’

– सौ. शालिनी सावंत (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ६८ वर्षे) अभिजित यांच्‍या आई) फोंडा, गोवा. (१०.४.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक