ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक ! – डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

९६ वे अखिल भारतीय मराठी संमेलन

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग

वर्धा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – आध्यात्मिक उंचीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ साहित्यिक म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा आहेत. त्यांनी मराठीला साहित्याचा अमर ठेवा दिला. अन्य साहित्य आज आहे; पण काही दशकांनी वाचलेही जाणार नाही. या तिघांचे साहित्य मात्र कायम वाचले जाईल. त्या अनुषंगाने आळंदी, देहू आणि वर्धा ही साहित्यिकांची पंढरी झाली पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले. वर्धा येथे ९६ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात दुसर्‍या दिवशी त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

डीएनए न्युज मराठी 

डॉ. बंग पुढे म्हणाले, ‘‘हिंदु’ हा शब्द अरबांनी दिलेला आहे. सिंंधु प्रदेशात रहाणारे ते हिंदु. हा शब्द परकियांनी दिलेला आहे. विनोबांनी ‘हिंदु’ या शब्दाविषयी, ‘हिंसे या दुरयिते चिंतम् ।’ म्हणजे ‘हिंसेने ज्याच्या चित्ताला दु:ख होते, तो खरा हिंदु !’, असे सांगितले. आता परत हिंदुत्व त्याच्या हिंसक आणि आक्रमक अवतारात प्रकट झालेले आहे. विनोबांचे साहित्य त्याच्या मूळ अर्थाशी जोडणारे आहे.’’

महाराष्ट्राचे राजकारण मद्याच्या पैशांवर राज्य चालत असल्याचा आरोप !

डॉ. बंग म्हणाले, ‘‘हे महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ झाले आहे. राज्यात २ लाख कोटी रुपयांचे मद्य लोक पितात. महाराष्ट्राचे राजकारण मद्याच्या पैशांवर राज्य चालते. त्याच्या पैशांवर निवडणुका जिंकल्या जातात.’’

बंग यांची अध्यात्माकडे वाटचाल !

डॉ. बंग म्हणाले, ‘‘मला विनोबांचा पुष्कळ सहवास लाभला. इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली, तेव्हा विनोबांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे समस्त भारतियांना आणि मलाही वाईट वाटले. त्यानंतर काही काळासाठी मी त्यांच्यापासून लांब गेलो होतो. कालांतराने माझी ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ची शस्त्रक्रिया झाली. त्या वेळी विनोबांनी लिहिलेल्या ‘इषोपशिषद’च्या ओळी अचानक आठवल्या. तेव्हापासून माझ्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्यानंतर मी परत विनोबांकडे वळलो. मी त्यांच्यापासून इतकी वर्षे दूर राहिलो, याचा मला पश्‍चाताप झाला. त्यानंतर त्यांच्या दृष्टीतून आत्मा आणि अध्यात्म समजून घेण्याचा प्रयत्न चालू केला. प्रतिदिन मी त्यांची ‘गीताई’ वाचतो. त्यातून त्यांच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय भूमिकांविषयी असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. त्यातून त्यांच्याविषयी असलेला माझा अपसमज दूर झाला. त्यांची जयप्रकाश आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा या दोघांकडेही बघण्याची समदृष्टी होती, हे लक्षात आले. आता ५० वर्षांनी त्यांना समजून घेत आहे.’’