मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित !

मुंबई, २५ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्रात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा चालू आहे; मात्र मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने मे २०१३ मध्ये ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’, यासाठी केंद्र सरकारला सविस्तर अहवाल पाठवला आहे; मात्र ९ वर्षे झाली, तरी अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

१. अनेक वर्षे रखडलेल्या या निर्णयावर कार्यवाही व्हावी, यासाठी वर्ष २०२२ मध्ये तत्कालीन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली. या वेळी रेड्डी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे सांगत याविषयी लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे सांगितले; मात्र यालाही १ वर्ष होऊन गेले आहेे.

३. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. मराठी भाषा विभागाकडून याविषयी प्रधान सचिव आणि मुख्य सचिव यांच्याकडूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे सातत्याने पाठपुरावा चालू असल्याचे सांगण्यात आले.

४. आतापर्यंत देशात संस्कृत, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम् आणि ओडिया यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अभिजात भाषेच्या मान्यतेसाठी आवश्यक निकषांचे सर्व पुरावे देऊनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीचा प्रश्‍न रखडला आहे, ही वस्तूस्थिती आहे.

अभिजात दर्जा म्हणजे काय ?

‘अभिजात भाषा’ हा भारत शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा दर्जा आहे. श्रेष्ठ दर्जाच्या साहित्याची निर्मिती झालेल्या प्राचीन भाषेला ‘अभिजात भाषा’ असे म्हणतात. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी संबंधित भाषा प्राचीन असायला हवी. साहित्यामध्ये तिचे महत्त्वाचे योगदान असावे. ती भाषा स्वयंभू आणि स्वयंपूर्ण असावी, तसेच सध्याच्या नव्याने आलेल्या भाषेपेक्षा वेगळी असावी, असे निकष आहेत.

अभिजात भाषेच्या विकासासाठी केंद्रशासनाकडून केले जाते साहाय्य !

अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त झाल्यावर त्या भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान दिले जाते. त्या भाषेतील प्रतिभावंतांसाठी प्रतिवर्षी २ आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. त्या भाषेचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन यांसाठी स्वतंत्र केंद्राची स्थापना केली जाते, तसेच प्रत्येक विद्यापिठात त्या भाषेचे अध्ययन केंद्र स्थापन केले जाते.