समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेणे का महत्त्वाचे ?

पू. संदीप आळशी

‘समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेण्‍याची माझी क्षमता नाही’, ‘समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेतल्‍यास मला व्‍यष्‍टी साधनेला वेळ मिळणार नाही’, यांसारख्‍या विचारांमुळे काही साधक समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेत नाहीत. काही साधक त्‍यांना होणार्‍या आध्‍यात्मिक त्रासाचे किंवा आजारपणाचे कारण सांगून दायित्‍व घेण्‍यापासून मागे हटतात. ही कारणे काही प्रमाणात योग्‍य असली, तरी यासंदर्भात पुढील कारणेच बहुतांशी प्रमाणात असतात – समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेतांना विविध प्रकृतींच्‍या साधकांशी जुळवून घेण्‍यात होणारा मनाचा संघर्ष नको वाटणे, दायित्‍व सांभाळतांना चुका झाल्‍यास साधनेत अधोगती होण्‍याची भीती वाटणे, दायित्‍व सांभाळतांना होणारे अतिरिक्‍त श्रम घेण्‍याची सिद्धता नसणे इत्‍यादी.

समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेतल्‍यास ती सेवा समयमर्यादेत पूर्ण होण्‍यासाठी साहजिकच आपल्‍याकडून अधिकाधिक वेळ देऊन प्रयत्न होतात, म्‍हणजेच तनाचा अधिक त्‍याग होतो. ‘सेवा लवकर कशी होईल ?’, हा एकच विचार मनात असल्‍याने इतर अनावश्‍यक विचार मनात येण्‍याचे प्रमाण पुष्‍कळ अल्‍प होते, म्‍हणजेच मनाचा अधिक त्‍याग होतो. ‘सेवा परिपूर्ण कशी होईल ?’, हा ध्‍यास लागल्‍याने बुद्धीच्‍या स्‍तरावर सारखे मनन-चिंतन चालू असते, म्‍हणजेच बुद्धीचा अधिक त्‍याग होतो. ‘सेवा म्‍हणजेच गुरुकार्य चांगले व्‍हायला हवे’, या तळमळीपोटी सेवेत सहभागी असणार्‍या साधकांना समजून घेऊन प्रसंगी त्‍यांच्‍यापुढे नमतेही घ्‍यावे लागते. यामुळे प्रेमभाव वाढण्‍यासह अहंही अल्‍प होतो. थोडक्‍यात दायित्‍व घेऊन सेवा केल्‍याने साधना अधिक चांगली होऊन गुरुकृपा लवकर होण्‍यास साहाय्‍य होते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी त्‍यांचे गुरु सगुणरूपात असतांनाच्‍या काळात गुरूंचे ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’, ‘अमृत महोत्‍सव’ यांसारखे कार्य पुष्‍कळ दायित्‍व घेऊन केले. ‘सर्वत्र अध्‍यात्‍माचा प्रसार करा !’, या गुर्वाज्ञेचे पालन ते आज वयाच्‍या ८० व्‍या वर्षीही तेवढ्याच तळमळीने करत आहेत. सनातनच्‍या सर्व समष्‍टी संतांवर विविध दायित्‍वे आहेत; किंबहुना विविध सेवांचे दायित्‍व घेऊन ते समर्थपणे पार पाडल्‍यामुळेच देवाने त्‍यांची शीघ्र आध्‍यात्मिक उन्‍नती घडवून आणली आहे. असे असतांना ‘आपण दायित्‍व घेऊन सेवा करायला नको का ?’, याचा साधकांनी अंतर्मुखतेने विचार करायला हवा. दायित्‍व घेण्‍याचा प्रयत्न करून पहाण्‍याचे पहिले पाऊल उचलल्‍यावर ‘देव आपल्‍याकडे दहा पावले चालत येतो’, म्‍हणजेच ‘आपले दायित्‍व हळूहळू देवच घेऊ लागतो’, अशी अनुभूतीही येते ! दायित्‍व घेण्‍याविषयी खरोखरच काही अडचण वाटत असल्‍यास त्‍याविषयी आपल्‍या सेवांचे दायित्‍व असणार्‍या साधकांचे मार्गदर्शन घ्‍यावे.’

– (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)